नांदेड :- नैसर्गिक शेतीच्या प्रसारासाठी आणि विषमुक्त अन्ननिर्मितीला चालना देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी नांदेड, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व आत्मा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नैसर्गिक शेती अभियान’ अंतर्गत जैविक निविष्ठा निर्मिती व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम नांदेड तालुक्यातील ढोकी, सुगांव व पिंपळगाव कोरका या गावांमध्ये आयोजित करण्यात आला होता.
रासायनिक शेतीला सक्षम पर्याय उपलब्ध करून देत शेतीचा खर्च कमी करणे आणि जमिनीचे आरोग्य सुधारणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता. यावेळी कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देताना, “शाश्वत शेतीसाठी आणि जमिनीच्या सुपीकतेच्या जतनासाठी नैसर्गिक शेती हाच सर्वोत्तम मार्ग आहे,” असे प्रतिपादन केले.
*तज्ञांचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिके*
या प्रशिक्षणात विविध विषयांच्या तज्ञांनी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले:
प्रा. माणिक कल्याणकर (पीक संरक्षण तज्ञ):
नैसर्गिक पद्धतीने कीड व रोग नियंत्रण करण्याच्या उपाययोजनांवर मार्गदर्शन करताना त्यांनी दशपर्णी अर्कासह विविध वनस्पतिजन्य अर्कांचा प्रभावी वापर स्पष्ट केला.
• डॉ. महेश आंबोरे (पशुवैद्यक तज्ञ):
देशी गायीचे शेण व गोमूत्र वापरून गुणवत्तापूर्ण जैविक निविष्ठा तयार करण्याचे महत्त्व आणि पशुधन व्यवस्थापनाविषयी माहिती दिली.
• प्रा. संदीप जायभाये (कृषी विद्यातज्ञ):
जीवामृत, घनजीवामृत आणि बीजामृत तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करत नैसर्गिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची माहिती दिली.
• डॉ. सौ. अमिता क्षत्रिय (कृषी विस्तार तज्ञ):
नैसर्गिक शेतीचा प्रसार, शेतकरी संघटनांचे महत्त्व आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले.
• सौ. अलका पवळे (गृह विज्ञान तज्ञ):
नैसर्गिक शेतीमालाचे आहारातील महत्त्व आणि महिलांचा सहभाग अधोरेखित केला.
*शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
या प्रशिक्षणाला ढोकी, सुगांव, पिंपळगाव कोरका तसेच नाळेश्वर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांचीही उपस्थिती होती. प्रशिक्षणानंतर शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे तज्ञांनी समाधानकारक निरसन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी, निसर्गाचा समतोल राखत शाश्वत व खर्चिकदृष्ट्या परवडणारी शेती करण्यासाठी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.