नांदेड :- आहेरवाडी येथील भूमिपुत्र गणपत मोरे यांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) यांच्या वतीने “उत्कृष्ट गुणवंत कामगार” पुरस्काराने गौरविण्यात आले.हा पुरस्कार दिनांक १ मे २०२६ रोजी प्रदान करण्यात आला असून त्यांच्या या यशाबद्दल परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.महावितरण कंपनीच्या नांदेड परिमंडळांतर्गत परभणी सर्कल,सेलू उपविभागातील ३३ केव्ही उपकेंद्र सेलू येथे प्रधान यंत्रचालक या पदावर कार्यरत असलेल्या गणपत मोरे यांनी मार्च २०२६ महिन्यात वीज बिल वसुलीत उल्लेखनीय कामगिरी बजावत आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वीज बिल वसुलीचे काम अत्यंत प्रभावीपणे पूर्ण केले.
त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेत नांदेड परिमंडळ कार्यालयातील मुख्य अभियंत्यांच्या हस्ते त्यांना “उत्कृष्ट गुणवंत कामगार” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या सन्मानामुळे गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
गणपत मोरे यांनी भविष्यातही महावितरण कंपनीची थकबाकी वसुली अधिक सक्षमपणे करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.तसेच नांदेड परिमंडळातील वसुली कामगिरी अधिक चांगली राहावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
त्यांच्या या यशामुळे आहेरवाडी व परिसरातील युवकांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.