नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील तीन कर्मचाऱ्यांचा सेवागौरव सोहळा गुरुवारी, दि. ३० एप्रिल, २०२६ रोजी अधिसभा सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. प्रदीर्घ व समर्पित सेवेनंतर सेवानिवृत्त होत असलेल्या या कर्मचाऱ्यांचा विद्यापीठाच्या वतीने सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला.
सोहळ्यात उपकुलसचिव मेघशाम वामनराव साळुंके, कनिष्ठ लिपिक कविता गोविंदराव गुरधाळकर आणि प्रयोगशाळा परिचर राजकुमार वसंतराव हस्सेकर यांचा कुटुंबीयांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
उपकुलसचिव मेघशाम साळुंके यांनी २७ वर्षे ९ महिने सेवा बजावत सहायक अधीक्षक पदापासून उपकुलसचिव पदापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. परीक्षा, शैक्षणिक विभाग व लातूर उपकेंद्रातील त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला. कविता गुरधाळकर यांनी २६ वर्षे ८ महिने आस्थापना, ज्ञानस्रोत केंद्र, परीक्षा व लेखा विभागात शिस्तबद्ध सेवा दिली. तर राजकुमार हस्सेकर यांनी ३४ वर्षे ७ महिने जीवशास्त्र संकुलात कार्यरत राहून मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन हे होते. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा जैवतंत्रशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. बी. एस. सुरवसे, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, वित्त व लेखाधिकारी डॉ. राजेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सत्कारमूर्ती मेघशाम साळुंके, कविता गुरधाळकर, गोविंदराव गुरधाळकरआणि राजकुमार हस्सेकर, सौ. हस्सेकर यांना शाल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी कर्मचाऱ्यांच्या निष्ठा व योगदानाचे कौतुक करत विद्यापीठ ही एक कुटुंब असून कर्मचाऱ्यांचा गौरव करणे ही परंपरा असल्याचे सांगितले. सत्कारमूर्तींनीही आपल्या भावना व्यक्त करत सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ राजेश शिंदे, उद्धव हंबर्डे, शिवराम लुटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी तर व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारोती गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, डॉ. सिंकू कुमार सिंग, डॉ. टी. ए. कदम, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सहा. कुलसचिव रामदास पेद्देवाड, तुकाराम भुरके, अनिरुद्ध राहेगावकर, विधी अधिकारी विनायक भोसले, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व मान्यवर व सत्कारमूर्तीचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.