### **’स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ व ‘माझी वसुंधरा ७.०’ अंतर्गत स्वच्छता मोहीम आणि विकास नियोजनाचा अभिनव उपक्रम संपन्न**
सांगली शहराच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या आमराई उद्यानाचे सौंदर्य जतन करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक विकास साधण्यासाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने आज **’स्वच्छता मोहीम, लोकसंवाद व विकास नियोजन’** हा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला. आयुक्त **श्रीम. संजीता महापात्र** यांनी स्वतः नागरिकांशी संवाद साधून उद्यानाच्या विकासाचा आराखडा निश्चित करण्यावर भर दिला.
कार्यक्रमाची सुरुवात उद्यान परिसरातील व्यापक स्वच्छता मोहिमेने करण्यात आली. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ आणि ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानांतर्गत प्लास्टिक संकलन, कचरा निर्मूलन आणि परिसर सौंदर्यीकरणासाठी मान्यवर लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी प्रत्यक्ष श्रमदान केले. “माझे उद्यान – माझी जबाबदारी” या भावनेतून अबालवृद्धांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला.
स्वच्छता मोहिमेनंतर आयोजित संवाद सत्रात आयुक्त संजीता महापात्र यांनी उपस्थितांशी थेट चर्चा केली. यावेळी नागरिकांनी उद्यानातील प्रकाश व्यवस्था, सुरक्षा, स्वच्छता गृहांची सोय, हरित क्षेत्रातील वाढ आणि व्यायामासाठीच्या सोयींबाबत विविध सूचना मांडल्या. आयुक्तांनी या सर्व सूचनांची दखल घेत, त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभाग प्रमुखांना दिले.
याप्रसंगी बोलताना आयुक्त म्हणाल्या की, “शहराचा विकास केवळ प्रशासकीय निर्णयांनी नाही, तर लोकसहभागातून अधिक प्रभावी होतो. आमराई सारख्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. कचरामुक्त आणि प्लास्टिकमुक्त सांगली बनवण्यासाठी नागरिकांनी अशा उपक्रमात सातत्याने सहभाग नोंदवावा.”
या उपक्रमात महापालिकेचा अधिकारी वर्ग, मान्यवर लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, विद्यार्थी वर्ग, महिला गट तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभिनव उपक्रमामुळे प्रशासकीय पारदर्शकता वाढण्यास आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे. आगामी काळातही अशा प्रकारचे संवाद उपक्रम विविध भागांत राबवले जातील, असे महापालिका प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे.