नांदेड:-केंद्र शासनाच्या 'नशा मुक्त भारत अभियान' अंतर्गत १७ ते २६ जून या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या 'नशामुक्त सप्ताह' निमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
नवीन शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूक करून व्यसनमुक्त जीवनाची प्रेरणा देण्याच्या उद्देशाने २५ जून रोजी विद्यापीठाच्या विद्यार्थी वस्तीगृहात विशेष जनजागृती कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कैलास गायकवाड व अर्जुन काळे उपस्थित होते, तर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांची विशेष उपस्थिती लाभली.
अध्यक्षीय समारोपात डॉ. ज्ञानेश्वर पवार यांनी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त, जबाबदार आणि सुजाण नागरिक म्हणून घडावे, असे आवाहन केले. समाजहित आणि राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून अंमली पदार्थांच्या तस्करीला विरोध करण्याबरोबरच तंबाखू, सिगारेट, मद्य व इतर व्यसनांपासून दूर राहून प्रगत महाराष्ट्र आणि समृद्ध भारताच्या निर्मितीत प्रत्येकाने योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.
प्रमुख मार्गदर्शक कैलास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकण्यामागील कारणे, त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि त्यातून स्वतःला दूर ठेवण्यासाठी आवश्यक असलेली जीवनमूल्ये याविषयी मार्गदर्शन केले. स्वतःचे अनुभव कथन करत त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून कायम दूर राहण्याचा संदेश दिला. विद्यार्थी शिवराज वडजे आणि निखिल गोरटकर यांनीही आपल्या मनोगतातून नशामुक्तीबाबत सकारात्मक विचार व्यक्त केले.
२६ जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन आणि अवैध तस्करी विरोधी दिन म्हणून पाळला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना नशामुक्त राहण्याची सामूहिक शपथ देण्यात आली. तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी विद्यापीठ परिसरात जनजागृतीपर फलक प्रदर्शित करून व्यसनमुक्तीचा संदेश व्यापकपणे पोहोचविला. या अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मारुती गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नंदकुमार बोधगिरे यांनी केले, तर विद्यार्थी प्रतिनिधी भास्कर किरवले यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.