नांदेड :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्या उपकंपनीच्या विविध 14 महामंडळामार्फत इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगिन कल्याणासाठी बेरोजगारांसाठी स्वयंम उद्योगासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. सदर कर्ज योजना ही बँकेमार्फत असून लाभार्थ्याने महामंडळाच्या वेबसाईडवर ऑनलाईन अर्ज www.msobcfdc.org या संकेतस्थळावर भरावा. तसेच सदर योजनेचा लाभ हा इतर मागासवर्गीय समाजातील व्यक्तीने जास्तीतजास्त घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. एन. झुंजारे यांनी केले आहे.
या उपकंपनीत जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज कैशशिल्पी महामंडळ, संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ, स्व. विष्णुपंत रामचेंद्र दादरे (लोणारी) अर्थिक विकास महामंडळ, संत रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ, लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ, सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ, संत भोजलींग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ, आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ, श्री संत नामदेव महाराज शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ, सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ, संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ या 14 महामंडाळाचा समावेश आहे.
इतर मागासवर्गीय प्रवार्गातील गरजु व कुशल व्यावसायिक व्यक्तींना कृषी सलग्न व पारंपारीक उपक्रम, लघु उद्योग, मध्यम उद्योग उत्पादन, व्यापर विक्री सेवाक्षेत्र इत्यादी व्यवसायासाठी या महामंडळाच्या योजनाची माहिती पुढील प्रमाणे देण्यात यावी.
*रुपये 1 लक्ष पर्यंतची थेट कर्ज योजना*
या योजनेमध्ये अर्जदाराचा सिबील केडिट स्काअर किमान 500 पेक्षा जास्त असावा, अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रू. 1 लक्ष पेक्षा कमी असावे, परतफेडीचा कालावधी 48 समान मासिक हप्त्यांमध्ये राहिल, नियमीत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्याना या योजनेत व्याज अदा करावे लागणार नाही परंतू थकित झालेल्या हप्त्यांवर द.सा.द.शे. ४ टक्के व्याजदर आकरण्यात येईल.
*20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना*
या योजनेमध्ये 75 टक्के रक्कम ही बँकेची असून त्यावरील व्याज हे बँकेच्या नियमाप्रमाणे राहील 20 टक्के रक्कम ही महामंडळची असून त्यावर द.सा.द.शे. 6 टक्के व्याज आकारण्यात येते व 5 टक्के सहभाग हा लाभार्थ्यांचा आहे, या योजनेची कर्ज मर्यादा रुपये 5 लाखापर्यंत असून परतफेडीचा कालावधी पाच वर्षाचा समान 60 हप्त्याचा आहे.
*वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना*
सदर योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज मर्यादा रू. 15 लक्ष पर्यतची आहे. सदर योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. या योजनेत कुटुंबाचे वार्षीक उत्पन्न मर्यादा 8 लक्ष पर्यत आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषाप्रमाणे तसेच कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादित) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल तसेच लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरू असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे.
*गट कर्ज व्याज परतावा योजना*
सदर योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज मर्यादा रू. 10 लक्ष ते 50 लक्ष पर्यंतची आहे या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. गटातील लाभार्थीचे वय 18 ते 45 वर्षे असावे तसेच गटातील लाभार्थ्यांनी यापुर्वी महामंडळाचा किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा तसेच इतर मागास प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहीत केलेल्या वार्षीक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचतगट, भागीदार संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत ), LLP, FPO अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थाना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीसाठी जे कर्ज दिले जाईल त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरनानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.
*शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना*
सदर योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा देशातर्गत व परदेशी उच्च शिक्षणासाठी कर्ज मर्यादा रू. 10 ते 20 लक्ष पर्यतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांचे वय 17 ते 30 वर्षे असावे, अर्जदाराची कोटोबीक वार्षीक उत्पन्न मर्यादा रू. 8 लक्ष असावी, विद्यार्थी बारावी 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असावा. रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरनानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.
*महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना*
ही योजना महिता आर्थीक विकास महामंडळाच्या लोक संचालीत साधन केंद्र (CMRC) मार्फत राबविल्या जात असून इतर मागास प्रवार्गातील किमान 50 टक्के महिलांचा समावेश असलेल्या पात्र महिला बचत गटास प्रथम टप्यात रू. 5 लक्ष पर्यत कर्ज बँकेमार्फत उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात येईल. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषाप्रमाणे तसेच कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम ( 12 टक्केच्या मर्यादित) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपर्कासाठी पत्ता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर नांदेड 431605 (०२४६२) २२०८६५ वेबसाइट - www.msobcfdc.org येथे संपर्क साधावा.