*प्रखर राष्ट्रभक्त वीर सावरकरांना अभिवादन* स्वातंत्र्यलढ्यातील अद्वितीय धैर्य, राष्ट्रनिष्ठा आणि त्यागाचे प्रतीक असलेले विनायक दामोदर सावरकर यांनी ८ जुलै १९१० रोजी एस. एस. मोरिया (Morea) जहाजातून फ्रान्समधील मार्सेलिस बंदरात घेतलेल्या ऐतिहासिक उडीस ११६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिक्षण मंडळ भगूर संचलित श्री एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, देवळाली कॅम्प येथे त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृत्युंजय कापसे यांनी सावरकर यांच्या क्रांतिकारी जीवनकार्याचा, राष्ट्रभक्तीचा, साहित्यिक योगदानाचा तसेच स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या अतुलनीय कार्याचा सविस्तर आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी सावरकर यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन राष्ट्रहित, स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकीची जपणूक करावी, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. तुषार तेलोरे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करून त्यांच्या राष्ट्रप्रेम, त्याग आणि स्वातंत्र्यनिष्ठेच्या विचारांचा अंगीकार करण्याचा संकल्प व्यक्त केला.