जुलैअखेरीस ४० हजारांहून अधिक अपूर्ण घरकुले पूर्ण करा;सीईओ महेश पाटील यांचे निर्देश

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 06/07/2026 8:39 PM

नांदेड :- प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत तिसरा हप्ता वितरित झालेल्या ४० हजार ७५३ अपूर्ण घरकुलांचे काम जुलैअखेरीस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी सर्व गट विकास अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम राबवावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी आज दिले.

जिल्हा परिषदेत आज मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या उपस्थितीत तालुकानिहाय आढावा बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तसेच विविध राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, सर्व विभाग प्रमुख तसेच जिल्ह्यातील गट विकास अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत तिसरा हप्ता प्राप्त झालेल्या ४० हजार ७५३ अपूर्ण घरकुलांची ग्रामीण गृहनिर्माण अभियंता निहाय लाभार्थी यादी तयार करून प्रत्येक घरकुलाचे नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक लाभार्थ्याशी सातत्याने संपर्क ठेवून प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही निर्देश देण्यात आले.

 याशिवाय, प्रलंबित घरकुलांचे वर्गीकरण, पात्र लाभार्थ्यांना वेळेत निधी वितरण, पूर्ण झालेल्या घरकुलांना सौर ऊर्जेचा लाभ, रमाई, शबरी व मोदी आवास योजनांतील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, मनरेगाच्या समन्वयातून घरकुलांची कामे पूर्ण करणे तसेच आवास प्लस सर्वे २०२४ आणि पीएम जनमन योजनेतील प्रलंबित बाबी तातडीने निकाली काढण्याच्या सूचनाही बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी दिल्या.

Share

Other News

ताज्या बातम्या