अर्धापूर पोलिसांची धडक कारवाई; 7.82 लाखांचा प्रतिबंधित गुटखा व वाहन जप्त,दोन आरोपी जेरबंद

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 12/07/2026 2:54 PM

नांदेड:-मा. श्री. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एकूण ₹7,82,040/-किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक 11 जुलै 2026 रोजी पोलीस स्टेशन अर्धापूर येथील अधिकारी व अंमलदारांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, हिंगोली येथून नांदेडच्या दिशेने स्विफ्ट डिझायर कार (क्र. MH-29-BC-2692) मधून प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक केली जात आहे. प्राप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने चोरंबा फाटा, ता. अर्धापूर येथे सापळा रचून सदर वाहन अडवून पंचासह वाहनाची कसून तपासणी केली. तपासणी दरम्यान वाहनामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला मोठ्या प्रमाणावर गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.

या कारवाईत सकलेन मुश्ताक देशमुख (वय 26 वर्षे, रा. पेन्शनपुरा, हिंगोली) व आरिफ शेख नदीम शेख (वय 27 वर्षे, रा. मस्तानशहा नगर, हिंगोली) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींकडून विविध ब्रँडचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू असा अंदाजे ₹2,82,040/- किमतीचा माल तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार (MH-29-BC-2692) किंमत अंदाजे ₹5,00,000/- असा एकूण ₹7,82,040/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश भगवानराव भोसले यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन अर्धापूर येथे गुन्हा क्रमांक 369/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम 123, 223, 274, 275, 3(5) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे हे करीत असून अवैध गुटखा पुरवठा साखळीतील इतर संबंधीतांचा शोध घेण्याचे काम सूरु आहे.

ही कारवाई मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. महादेव मांजरमकर, पोलीस निरीक्षक, श्री. सुरेश भोसले, पोलीस उपनिरीक्षक, पोह/2177 मुंगल, पोशि/664 अखील बेग, पोशि/615 विजय कदम, चालक पोशि/2788 हेमंत बिचकेवार सर्व नेमणुक अर्धापुर पोलीस स्टेशन यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध साठा, विक्री व वाहतुकीविरुद्ध नांदेड जिल्हा पोलीस सातत्याने कठोर कारवाई करीत असून, अशा प्रकारची माहिती नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा पोलीस नियंत्रण कक्षास कळवावी, असे नांदेड जिल्हा पोलीस जनतेस आवाहन करीत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या