महानगरपालिकेच्या शिक्षण, महिला व बालकल्याण समितीची बैठक संपन्न;शाळांची सुरक्षा, आरोग्य शिबिरे आणि 'विकसित भारत २०२४' संकल्पनेवर भर

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 13/08/2026 9:04 PM

नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, महिला व बालकल्याण समितीची बैठक *सभापती सौ.सदिच्छा सोनी पाटील* व *उपसभापती निरंजना लांडगे* यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ०३.०० वाजता महापालिकेच्या मुख्यालयात संपन्न झाली. या बैठकीत मनपा शाळांचा कायापालट करणे, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि महिला-बालकांच्या आरोग्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा होऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

या बैठकीत प्रारंभी दिनांक २८/०७/२०२६ रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत पारित करण्यात आलेल्या विविध ठरावांच्या प्रगतीचा आणि अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या व शालेय मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व शाळांना मजबूत संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मनपाच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत प्रत्येक क्षेत्रात किमान एक याप्रमाणे विशेष महिला व बाल आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या 'विकसित भारत २०४७' या संकल्पनेला पूरक ठरेल अशा पद्धतीने मनपा शाळांमध्ये डिजिटल शिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा आणि आवश्यक ते सर्व सुधारात्मक बदल तातडीने केले जातील.

मनपाच्या सर्व शाळांमध्ये स्वच्छता, शिस्त आणि सुशोभीकरणाला प्राधान्य देण्यासाठी 'सुंदर शाळा, स्वच्छ शाळा' हा विशेष उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आणि शाळांचा परिसर आल्हाददायक करण्यासाठी सर्व मनपा शाळांच्या आवारात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जाईल. या बैठकीत सभापती यांच्या मान्यतेने बैठकीत आयत्या वेळी आलेल्या इतरही काही स्थानिक व तातडीच्या विकासकामांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या बैठकीला समितीचे सन्माननीय सदस्य, उपायुक्त अभिजित वायकोस, उपायुक्त गंगाधर ईरलोड, उपायुक्त तथा नगरसचिव स.अजितपालसिंघ संधु, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत रिठ्ठे, शिक्षणाधिकारी प्रविणा मांदळे, मुख्य उद्यान अधिक्षक डॉ.मिर्झा बेग, सहा.आयुक्त निलावती डावरे, भांडार अधिक्षक नागनाथ पतंगे, जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे, प्रकल्प व्यवस्थापक चंद्रकांत कदम व प्रविण मगरे आदी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या