'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत महापालिकेच्या वतीने भव्य 'तिरंगा बाईक रॅली' उत्साहात संपन्न; रॅलीस अभूतपूर्व प्रतिसाद

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 13/08/2026 9:08 PM

नांदेड : भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासानिमित्त आणि 'वंदे मातरम'च्या १५० व्या वर्षानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार देशभरात 'हर घर तिरंगा २०२६' अभियान अत्यंत उत्साहात सुरू आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून दि.१३.०८.२०२६ रोजी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरात एक भव्य आणि अभूतपूर्व *'तिरंगा बाईक रॅली'* काढण्यात आली. शेकडो दुचाकीस्वार, हातात डौलाने फडकणारा राष्ट्रध्वज आणि 'भारत माता की जय'च्या गगनभेदी घोषणा अशा अत्यंत भारावून टाकणाऱ्या वातावरणात ही रॅली संपन्न झाली. या रॅलीने आज संपूर्ण नांदेड शहराला देशप्रेमाच्या रंगात रंगवून टाकले.

या अभूतपूर्व तिरंगा बाईक रॅलीची सुरुवात नविन नांदेड भागातील हडको बस स्टॉप पासुन करण्यात आली. हडको चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन केल्यानंतर तिरंगा कॅनव्हसवर स्वाक्षरी करुन *महापौर सौ.कविता संतोष मुळे* आणि *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या हस्ते संयुक्तपणे रॅलीला हिरवा झेंडा दाखवून प्रस्थान करण्यात आले. या प्रसंगी उपसभापती निरंजना लांडगे, नगरसेवक संजिव घोगरे, वैजनाथ देशमुख, दिपाली मोरे, प्रभावती कुंजीवाले, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त अभिजित वायकोस, नितीन गाढवे, स.अजितपालसिंघ संधु, गंगाधर ईरलोड, सहायक आयुक्त मो.गुलाम सादेक, नगररचनाकार ओम लहाने, मुख्य उद्यान अधिक्षक डॉ.मिर्झा बेग, क्रिडा अधिकारी रमेश चवरे, कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर, संघरत्न सोनसळे, सर्व क्षेत्रिय अधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.यांच्यासह महापालिकेचे इतर विभाग प्रमुख, कर्मचारी आणि शहरातील नामांकित सामाजिक व क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रॅलीच्या सुरुवातीलाच पालिका कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन गगनभेदी घोषणा दिल्या. रॅलीच्या अग्रभागी असलेल्या वाहनावरून देशभक्तीपर गीते वाजवली जात होती, ज्यामुळे सहभागी झालेल्या प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहत होता. 'वंदे मातरम', 'भारत माता की जय' या घोषणांनी शहरातील संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीमय झाले होते. हडको बस स्टॉप पासुन सुरू झालेली ही भव्य रॅली शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली. सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक लातुर फाटा, कौठा, जुना मोंढा, महाविर चौक, वजिराबाद, कलामंदिर, शिवाजी नगर, आयटीआय कॉर्नर आणि व्हीआयपी रोड या प्रमुख भागांतून जात रॅलीचे संचलन करण्यात आले. या रॅलीचा समारोप तिरंगा ध्वज परिसर, शासकीय तंत्रनिकेतन चौक येथे राष्ट्रगिताने करण्यात आला.वाहतूक पोलीस प्रशासनाने केलेल्या चोख बंदोबस्तामुळे एवढी मोठी रॅली असतानाही शहरात कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही.

*घरोघरी तिरंगा फडकवा: मनपा आयुक्तांचे आवाहन*
रॅलीच्या यशस्वी समारोपानंतर उपस्थितांना संबोधित करताना मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे म्हणाले, "हा तिरंगा आपल्या देशाच्या अस्मितेचे, एकतेचे आणि शूरवीरांच्या बलिदानाचे प्रतीक आहे. आज पालिका कर्मचाऱ्यांनी व नांदेडकरांनी दाखवलेला हा उत्साह पाहता 'हर घर तिरंगा' हे केवळ शासकीय अभियान राहिले नसून ते एक राष्ट्रीय उत्सव बनले आहे. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की, प्रत्येकाने आपल्या घरावर, दुकानावर आणि व्यापारी संकुलांवर ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अत्यंत आदराने राष्ट्रध्वज फडकवावा आणि तिरंग्यासोबतचा आपला सेल्फी harghartiranga.com या अधिकृत पोर्टलवर अपलोड करून या राष्ट्रीय उत्सवाचा भाग व्हावे."

या भव्य रॅलीच्या यशस्वी नियोजनासाठी महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागासह पोलीस दल आणि पालिका कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शहरात यापूर्वी माता गुजरीजी विसावा उद्यान येथे विशेष तिरंगा आणि वंदे मातरम माहिती प्रदर्शन व शालेय विद्यार्थ्यांची तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. आजची ही बाईक रॅली नांदेड शहारात सर्वात मोठी देशभक्तीपर रॅली ठरली असल्याची चर्चा नागरिक करत आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या