शेटे महाविद्यालयात ‘जेन झी व छत्रपती शिवरायांची तरुण नीती’ विषयावर विशेष व्याख्यान
गणेशोत्सवानिमित्त विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे पारितोषिक वितरण
देवळाली कॅम्प : शिक्षण मंडळ भगूर संचलित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न श्री एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, देवळाली कॅम्प येथे गणेशोत्सवानिमित्त ‘जेन झी व छत्रपती शिवरायांची तरुण नीती’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गणेशोत्सवानिमित्त महाविद्यालयात आयोजित विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभही उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृत्युंजय कापसे होते. प्रमुख व्याख्याते म्हणून सुप्रसिद्ध व्याख्याते, कवी, लेखक व शिवचरित्रकार मा. श्री. समाधानजी हेंगडे पाटील उपस्थित होते. यावेळी भगूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष मा. श्री. प्रसादजी आडके, नगरसेवक मा. श्री. दीपक बलकवडे, नगरसेविका मा. सौ. सुजाता शिरसाठ, मा. सौ. विद्या बलकवडे, स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मोत्सव समितीचे कार्याध्यक्ष मा. श्री. संदीप शेटे तसेच समर्पण प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मा. सौ. मानसी वाळिंबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात भारत माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, मेहंदी, पोस्टर, वेशभूषा आदी सांस्कृतिक स्पर्धा तसेच बॅडमिंटन, कॅरम आणि बुद्धिबळ आदी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी मा. सौ. सुजाता विशाल शिरसाठ यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना, “विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा, कला आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आजच्या तरुण पिढीने ध्येय निश्चित करून आत्मविश्वासाने पुढे जावे,” असे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे उपक्रम सातत्याने राबविणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेल्या मा. श्री. समाधानजी हेंगडे पाटील यांनी ‘जेन झी व छत्रपती शिवाजी महाराजांची तरुण नीती’ या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. आधुनिक काळातील जेन झी पिढीसमोरील आव्हाने, बदलते तंत्रज्ञान, सामाजिक जबाबदारी, नेतृत्वगुण आणि युवकांची भूमिका यांचा ऊहापोह करत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा संदर्भ विद्यार्थ्यांसमोर मांडला. शिवरायांची दूरदृष्टी, ध्येयवाद, शिस्त, संघटनकौशल्य आणि स्वराज्यनिष्ठा यांसारखी मूल्ये आजच्या तरुणांनी आत्मसात करावीत, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मृत्युंजय कापसे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक अभ्यासाबरोबरच क्रीडा, कला, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांना व कौशल्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समर्पण प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मा. सौ. मानसी वाळिंबे यांनी केले. त्यांनी गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. तुषार तेलोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सुप्रिया हांडोरे यांनी केले.
गणेशोत्सवानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा मिळण्याबरोबरच त्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक कलागुणांना प्रोत्साहन मिळाले. विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण वंदेमातरम नंतर संपन्न झाला.