◼️ "थालेसेमिया आजार गंभीर नसला तरीही काळजी घेणे गरजेचे" - डॉ. भक्ती काकडे
◼️ग्रामीण रुग्णालयात थालेसेमिया दिन साजरा
वणी : "थालेसेमिया हा आजार सिकलसेल श्रेणीतला असल्याने तो आनुवंशिक आहे. तो पालकांकडून पाल्यामध्ये प्रसारित होतो.त्यामुळे या आजाराची काळजी घेणे गरजेचे आहे." असे प्रतिपादन शासकीय ग्रामीण रुग्णालय वणीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती काकडे यांनी या रोगावर माहिती देत असताना केले.
शासकीय ग्रामीण रुग्णालय वणीच्या ट्रॉमा केअर हॉल मध्ये ८ मे जागतिक थालेसेमिया दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र सुलभेवार हे होते तर मार्गदर्शक म्हणून ग्रामीण रुग्णालय वणीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती काकडे ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून परिसेविका अरुणा गुरनुले व गीत घोष होते.
ह्या कार्यक्रमात डॉ. काकडे पुढे बोलताना म्हणाल्या की, " हा आजार रक्तपेशी तयार न होणे किंवा कमी तयार होणे ह्यामुळे होत असतो. या थालेसेमिया आजाराचे मेजर आणि मायनर असे दोन प्रकार असून मायनर प्रकारात औषधे घेऊन लक्षणे कमी करता येतात. मात्र मेजर थालेसेमिया मध्ये बोन मॉरो ट्रान्सप्लांट करावा लागतो, त्यामुळे ह्याची काळजी घेणे अती आवश्यक असते. म्हणून लग्नापूर्वी आपण सर्वांनी ब्लड टेस्टिंग करूनच विवाह संबंध केले पाहिजे" , असेही जोर देऊन त्यांनी सांगितले.
हा कार्यक्रम हिंद लॅब्स डाइग्नोस्टिक सेंटर द्वारे घेण्यात आला होता. कार्यक्रमाचे संचालन कु. शीतल राजगडकर यांनी केले तर आभार धनश्री सूर्यवंशी यांनी मानले. हा दिवस लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी, माहिती देण्यासाठी साजरा केल्या जातो. या कार्यक्रमास शासकीय ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका, कर्मचारी व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.