नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील माध्यमशास्त्र संकुल व मीडियान जर्नालिझम सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने फोटो जर्नालिझम अॅक्टिव्हिटी २०२५ अंतर्गत ‘निसर्ग छायाचित्रण’ या विषयावर भव्य छायाचित्र प्रदर्शन व पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता माध्यमशास्त्र संकुलात संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. हुशारसिंग शंकरसिंग साबळे, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या हस्ते होणार असून, विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थिती लाभणार असल्याची माहिती डॉ. राजेंद्र गोणारकर, संचालक, माध्यमशास्त्र संकुल यांनी दिली आहे.
या छायाचित्र प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी निसर्गातील विविध पैलू, पर्यावरणीय सौंदर्य, वनस्पती, जैवविविधता तसेच निसर्गाचे सूक्ष्म दर्शन घडवणारी उत्कृष्ट छायाचित्रे सादर केली आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व छायाचित्रण कौशल्याला व्यासपीठ मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
सदर छायाचित्र प्रदर्शन दि. १६ ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत सर्वांसाठी खुले राहणार असून, सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत नागरिकांना प्रदर्शन पाहता येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन संकुलातील विद्यार्थी जाधव पुनमसिंग, नेहा पट्टेवाड, नवसागरे भिमराव, हटकर विक्रांत व फसमल्ले प्रशांत यांनी केले असून, कार्यक्रमाचे समन्वयन डॉ. सुहास डी. पाठक, डॉ. सचिन एम. नरंगले, डॉ. कैलाश बी. यादव, श्री. गिरीश जोंधळे व श्री. मनोहर सोनकांबळे यांनी केले आहे.
विद्यार्थी, छायाचित्रणप्रेमी तसेच निसर्गप्रेमींनी या दृश्यरम्य छायाचित्र प्रदर्शनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.