नांदेड :- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा ही केवळ धार्मिक परंपरेपुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातील व्यापार, संस्कृती व अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरत आहे. यात्रेच्या निमित्ताने येथे विविध वस्तूंचा भव्य बाजार भरला आहे.
या यात्रेत मुरमुरे, कलम, बताशा, गुळ फुटाणे, रेवड्या, चक्की लाडू, टिपरे, जिलबी, खडीसाखरेचे गोळे, साखरेचा हार, सुके पेढे, चुरमुरे, तिळगुळ वडी, गाठीया, लाह्या यासारख्या पारंपरिक खाद्यपदार्थांसह मातीची भांडी, पितळ व स्टीलची भांडी, स्वयंपाकघरातील वापराची भांडी, घागर, हंडे, तांब्या, कढई, पातेले, तसेच नव्या व जुन्या कपड्यांचा मोठा बाजार येथे भरतो. यासोबतच धोतर, शेलापागोटे, उपरणी, साड्या, ओढण्या, चादरी, सतरंज्या, ताडपत्री व प्लास्टिक कापडही मोठ्या प्रमाणावर विक्रीस उपलब्ध आहेत.
माळेगाव यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे पशुधन व पाळीव प्राण्यांसाठी लागणाऱ्या साहित्याचा स्वतंत्र व मोठा बाजार येथे भरतो. यात बैल, बकरी, घोडे, गाढव तसेच इतर विविध पशुधनांसाठी खोगीर, लगाम, पट्टे, दोर, जीन, नाल, चाबूक, घुंगरू, कासरे, झुली, घुंगरमाळा, घंट्या, साखळ्या, हार, चारा ठेवण्याची भांडी, बांधणीसाठी लागणारे साहित्य, कपाळ गोंडा, शिंगगोंडे, बोरखी यासारखी पारंपरिक व उपयोगी साधने विक्रीस उपलब्ध आहेत.
याशिवाय लोककलावंत व शेतकऱ्यांसाठी घोंगडी, रेशीम घोंगडी, काळी व पांढरी घोंगडी, कवड्यांच्या माळा, पायातील चाळ, नक्षीकाम केलेल्या काठ्या, लाकडी काठ्या तसेच विविध हस्तकला व लाकडी वस्तूंचीही विक्री होत आहे. महिलांसाठी सौंदर्य व दैनंदिन वापराच्या वस्तूंमध्ये बांगड्या, कुंकू, हळद, टिकल्या, काजळ, केसांचे क्लिप्स, कंगवे, कंबरबेल्ट, हरमाळ, मंगळसूत्र, पर्स तसेच संसारोपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. बाळगोपाळांसाठी विविध प्रकारची खेळणी, सजावटीच्या व शैक्षणिक खेळण्यांचाही या यात्रेत समावेश आहे.
या यात्रेत महाराष्ट्रासह परराज्यातील व्यापारीही मोठ्या संख्येने सहभागी झाले असून विविध राज्यांतील व्यापाऱ्यांनी येथे दुकाने थाटली आहेत. सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने यात्रेस उपस्थित राहतात. त्यांच्या धार्मिक, सांस्कृतिक, कौटुंबिक व व्यवसायिक गरजांसाठी लागणारे सर्व साहित्य एका ठिकाणी उपलब्ध होत आहेत. श्रद्धा, परंपरा आणि व्यापार यांचा संगम साधणारी माळेगाव यात्रा ग्रामीण विकासाला चालना देणारी ठरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.