पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाचा अवैध रेती उत्खनन व वाहतुक करणाऱ्यांवर छापा;2 कोटी रुपयांची साधनसामुग्री व वाळू जप्त

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 05/02/2026 5:28 PM

नांदेड :- नांदेड परिक्षेत्रातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी नांदेड जिल्हयातील मौजे मार्कड शिवारातील मार्कंडेश्वर महादेव मंदिराजवळ चालू असलेल्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे पथक पाठविले होते.

दिनांक 05.02.2026 रोजी रात्री 12:30 वाजे दरम्यान माळाकोळी ते खेडकर वाडी रोडवर भारत बेंज कंपनीचा एक हायवा अवैधरित्या वाळू वाहतूक करताना पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकास मिळून आला होता. सदर हायवा मधून सुमारे पाच ब्रास रेती वाहतूक होत असल्याचे आढळून आले होते. वाळूसह मिळून आलेला हायवा असा 20 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीस ठाणे माळाकोळी येथे जमा करण्यात आला होता. सदर प्रकरणी पोलीस ठाणे माळाकोळी येथे गु. र. नं. 16/26 कलम 303 (2) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर वाळू वाहतूक ही, नांदेड ग्रामीण हद्दीतील गोदापात्रातून होत असल्याचे आढळून आल्याने, विशेष पथकाने रात्री 02.00 वाजता दरम्यान पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण हद्दीतील मौजे मार्कंड शिवारातील मार्कंडेश्वर महादेव मंदिराजवळील धक्कयावर कारवाई करत Tata Signa कंपनीचे चार हायवा, एक JCB मशीन, नदीतून रेती उपसण्याचे एक इंजिन, वाळूने भरलेले (67) तराफे, दोन मशीन यासह नदीपात्रातून बाहेर काढून ठेवलेली (60) ब्रास वाळू, असा एकूण 1 कोटी 82 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, नमूद प्रकरणात पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

गोदावरी नदीपात्रातून इंजिनच्या मदतीने वाळू उपसण्याचे सदर कामकाज रात्रीचे अंधारात सुरु होते. मध्यरात्री 02.00 वाजता विशेष पथक सदर ठिकाणी दाखल होताच, इंजिन, तराफे, मशिनरी व हायवावरील लोकांनी आपले काम सोडून तेथून पळ काढला. सदर ठिकाणावरुन जप्त केलेल्या उपरोक्त साधन सामुग्रीवरुन या घाटावरुन मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा व साठवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उपरोक्तप्रमाणे दोन्ही कारवायांत पथकाने पाच हायवा किंमती 1 कोटी 60 लाख, एक JCB मशीन किंमती 25 लाख, एक रेती काढण्याचे इंजिन किंमती 1 लाख, (67) वाळूने भरलेले तराफे किंमती 13 लाख 40 हजार, (65) ब्रास वाळू किंमती 2 लाख 65 हजार, नदीपात्रातून वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणारी दोन मशीन किंमती 50 हजार असा असा एकूण 2 कोटी 2 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर कारवाईत सपोनि श्री श्रीराम माचेवाड यांचेसह पोहेकॉ प्रदिप खानसोळे, पोहेकॉ संजीव जिंकलवाड, पोकों / गणेश धुमाळ व पोकों/ कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांना 10,000/- रुपयांचे बक्षीस व प्रशंसापत्र देवून त्यांचे अभिनंदन केले आहे.

आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाच्या nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर किंवा 91 50 100 100 या 'खबर' हेल्पलाइनवर कळवून अशा अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी आपला हातभार लावावा, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या