नांदेड :- आगामी सण उत्सव व कायदा सुव्यवस्थेचे पार्श्वभूमीवर, दिनांक 11 ते 25 एप्रिल, 2026 दरम्यान, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रात गुटखा, अंमली पदार्थ व घातक शस्त्र विरोधी मोहिम राबविण्याचे निश्चित केले आहे. याबाबतच्या सविस्तर सूचना, दिनांक 10 एप्रिल रोजी परिक्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
सदर मोहिमेच्या पहिल्या दिवशी परिक्षेत्रात खालीलप्रमाणे कारवाया करण्यात आल्या आहेत.
अंमली पदार्थ व गुटखा विरोधी कारवाई :
नांदेड परिक्षेत्रात गुटखा विक्री करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123 अन्वये एकूण (2) गुन्हे दाखल करुन, त्यांच्याकडून 1,17,642/- रुपये किंमतीचा गुटखा व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमूद प्रकरणांत, गुटखा विक्री करणाऱ्या (2) आरोपींना अटक करण्यात आली आहे.
घातक शस्त्रांविरुद्ध कारवाई :
परिक्षेत्रात घातक शस्त्रांविरोधात राबविण्यात आलेल्या कारवाईत शस्त्र अधिनियमांतर्गत एकूण (11) गुन्हे दाखल करुन, आरोपींकडून 57,822/- रुपये किंमतीच्या तलवारी व खंजर जप्त करण्यात आले आहेत सदर प्रकरणी एकूण (12) आरोपींना अटक करण्यात आली आहे.
परिक्षेत्रात गुटखा, अंमली पदार्थ व घातक शस्त्रांच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात येत असून, गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची साठवण, वितरण व वाहतूक याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123 अन्वये, अंमली पदार्थांच्या विषयी NDPS कायदयान्वये व घातक शस्त्रांच्या विषयी शस्त्र अधिनियमान्वये कारवाई करण्यात येत आहे.
खबर ' हेल्पलाइन चा वापर करा अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना पोहोचविता यावी,
या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली 'खबर' नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.