राज्यघटनेतील ‘सेक्युलॅरिझम’चा खरा अर्थ जाणणे आवश्यक – प्रा. शेषराव मोरे

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 27/02/2026 2:34 PM

नांदेड :- आज धर्माने भारतीय समाजजीवन व राजकारणाचा ताबा घेतला आहे. राज्यघटनेतील ‘सेक्युलॅरिझम’चा खरा अर्थ कुणी समजून घेत नाही. भारतीय राज्यघटनेत ‘सेक्युलॅरिझम’ हा शब्द बेचाळीसाव्या दुरुस्तीपूर्वी नव्हता, हे खरे नव्हते. ‘सेक्युलॅरिझम’ या शब्दाचा ‘धर्मनिरपेक्षता’ असा केला जाणारा अनुवाद चुकीचा आहे. ‘धर्म’ या शब्दाचा अर्थ निरनिराळ्या पद्धतीने घेतला जातो. भारतीय घटना धर्माचा वाट्टेल तसा अर्थ घेण्यास प्रतिबंध करते. धर्म आणि सेक्युलर ह्या स्वतंत्र संकल्पना आहेत.”, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात बोलताना व्यक्त केले. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राद्वारे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. 
“भारतीय राज्यघटनेने सुरुवातीपासून धर्मसंस्थेवर मर्यादा घातलेली होती. कायदा व सुव्यवस्था यांच्या अटीवर धर्माचे पालन करणे बंधनकारक आहे. पारलौकिक जीवन हे धर्माच्या कक्षेत असले तरी ऐहिक जीवन हे राज्यघटनेने संचालित केले जाते. सामाजिक स्वास्थ्याला बाधा येईल अशा रितीने धर्माचे पालन करता येत नाही. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने विविध निकालात राज्यघटनेतील ‘सेक्युलॅरिझम’ या संकल्पनेवर विविध निर्णय देऊन ही संकल्पना स्पष्ट केले आहे. धार्मिक नितीमत्तेपेक्षा सांविधानिक नितीमत्ता महत्त्वाची आहे. धर्मानुसार नितीमत्ता पाळण्याचे स्वातंत्र्य राज्यघटना देत नाही.” असे ते म्हणाले.
“चालू वर्ष हे जायकवाडी धरणाच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. जायकवाडी धरणाने मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटण्यास मोलाची मदत झाली. तरीही, मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटलेला नाही. डॉ. शंकरराव चव्हाण केंद्राच्या वतीने मराठवाड्यातील पाणीप्रश्नावर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या सहाय्याने काम केले जाणार आहे.” असे मत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले. 
“मराठवाड्याचे प्रचलित रूप  बदलून मराठवाडा एक विकसित प्रदेश म्हणून पुढे आणणे आवश्यक आहे. यासाठी विद्यापीठ  डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राच्या वतीने विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील चारही जिल्ह्यांची पाहणी करणार आहे. या पाहणीनंतर विकासासाठीचा कृतिआराखडा तयार करून तो शासनास सादर करण्यात येणार आहे.” असे मत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नरेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. 
कार्यक्रमाचे प्रास्तविक केंद्राचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण यांनी केले. कार्यक्रमात प्रा. नंद्कुमार बोधगिरे, प्रा. शालीनी कदम, प्रा. बाबुराव जाधव, प्रा. पी. विठ्ठल, प्रा. भाऊसाहेब आदमाने, संदीप जाधव, तात्याराव पवळे, हरीश पाटील, गौतम गायकवाड, लक्ष्मण जाधव, राम जोगदंड, अण्णा पेरुका आदी आणि मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व संशोधक उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या