नांदेड :- महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष सध्या नांदेड दौऱ्यावर असुन *आयोगाचे अध्यक्ष श्री शेरसिंग रुक्कानसिंग डागोर* यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेत दिनांक १३.०३.२०२६ रोजी बैठक पार पडली. या बैठकीत नांदेड महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सद्यस्थितीचा आढावा आयोगाच्या अध्यक्षांनी घेतला. या बैठकीस *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्यासह अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपआयुक्त नितीन गाढवे, उपआयुक्त अभिजित वायकोस, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादेक, शहर अभियंता सुमंत पाटील नगरसेवक साहेबराव गायकवाड, अभिषेक सौदे व पालिकेच्या इतर विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
प्रारंभी महाराष्ट्र कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष श्री शेरसिंग डागोर यांचे मनपा आयुक्तांच्या हस्ते स्वागत करुन बैठकीस सुरुवात करण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीस पालिका उपआयुक्त नितीन गाढवे यांनी महानगरपालिकेतील कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सादरीकरण केले. ज्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रात एकुण ०७ झोन असुन त्यातील २० प्रभागामध्ये संपुर्ण शहराच्या साफ-सफाईचे कामे कायम व कंत्राटदारामार्फत नेमलेल्या सफाई कामगारांमार्फत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
महानगरपालिकेच्या मंजुर आकृतीबंधानुसार सफाई कामगारांची एकुण मंजुर पदसंख्या ८०५ असुन त्यापैकी आजमितीस ५४९ कायम कामगार कार्यरत आहेत तर २५६ कायम सफाई कागारांची पदे रिक्त आहेत.त्याचप्रमाणे कंत्राटदारामार्फत एकुण ३३७ सफाई कर्मचारी कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.महानगरपालिकेत महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना वारसा हक्काने नियुक्त्या दिल्या जातात.तसेच मनपा आस्थापनेवर स्थापनेपासुन सफाई कर्मचाऱ्यांना वाहन चालक, लिपीक, इत्यादी गट-क मधील पदावर पदोन्नत्या देण्यात येत असतात मागील ०३ वर्षाच्या कालावधीत एकुण ९६ सफाई कामगारांना पदोन्नती देण्यात आल्याचे यावेळी उपआयुक्तांनी सांगितले.
महानगरपालिकेत सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य निरोगी राहण्याच्या दृष्टीकोणातुन दरवर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन करुन आरोग्य विषयक तपासण्या करुन उपचार केल्या जातात. तसेच महानगरपालिकेच्या सफाई कामागारांना मास्क, हँडग्लोज, एप्रॉन, नाली फावडा, टोपले, नारळी झाडु, रेनकोट, गमबूट इत्यादी स्वच्छता विषयक साहित्य देण्यात येते. त्याचप्रमाणे ड्रेनेज विभागा अंतर्गत वॉटरप्रुफ बुट, रिचार्जेबल बॅटरी, सेफ्टी बेल्ट, सेफ्टी ग्लोज, सर्च लाईट, सेफ्टी गमशुट, नायलॉन लॉडर, नॉर्मल फेस मास्क, सेफ्टी हेल्मेट इत्यादी साहित्य पुरविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतना संदर्भात सफाई आयोगाच्या अध्यक्षांनी विचारणा केली असता कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदाई केल्या जात असुन ईपीएफ व इएसआयसी, ५% घरभाडे भत्ता अदाई करण्यात येत असल्याचे मनपा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच सफाई कामगारांना सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचा आर्थिक मोबदला सुध्दा दिल्या जातो असे नमुद करण्यात आले. BSUP योजने अंतर्गत बांधलेल्या १७७ सदनिका सफाई कर्मचाऱ्यांना मंजुर करुन महाराष्ट्र शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजने अंतर्गत ८१ सफाई कामागारांना मोफत सदनिकेचा ताबा दिला असल्याचे यावेळी पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाच्या अध्यक्षांनी यावेळी कामगार नेत्यांनाही आपली भुमिका मांडण्याचे आवाहन केल्यानंतर महापालिका कर्मचारी युनियनचे संस्थापक अध्यक्ष कॉ.गणेश शिंगे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकुण सफाई कामगारांसाठी स्वतंत्र वसाहत स्थापण करण्याची मागणी केली. त्यावर आयोगाच्या अध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन मनपा आयुक्तांना या विषयात लक्ष घालण्याचे निर्देश दिले. एकंदरीत बैठकीच्या समारोपास आयोगाच्या अध्यक्षांनी महानगरपालिकेच्या कामावर समाधान व्यक्त करुन बैठकीची सांगता करण्यात आली.