नांदेड :- जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकास उस्माननगर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे कौडगांव शिवारात पाठविले होते.
सदर पथकाने, दिनांक 12/03/2026 रोजी रात्री 8.00 वा. दरम्यान कौडगांव शिवारातील वाळू धक्कयावर कारवाई केली असता, सदर ठिकाणी इंजिन बोट च्या माध्यमातून नदी पात्रातून वाळू उपसा होत असल्याचे व सदर वाळू एका फायबर बोटीतून नदीकिनारी आणली जात असल्याचे निदर्शनास आले. सदर कारवाईत पथकाने, भारत बेंज कंपनीचे (5) हायवा, टाटा कंपनीचे एक टिपर, दोन पोकलेन मशीन, एक इंजिन बोट, एक फायबर बोट यांच्यासहित, नदीपात्रातून बाहेर काढून ठेवलेली (55) ब्रास वाळू, असा एकूण 2 कोटी 04 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नमूद प्रकरणात पोलीस ठाणे उस्माननगर येथे (09) आरोपीतांविरुद्ध गुरनं 53/2026 कलम 303 (2), 3(5) भा.न्या.सं. सह कलम 4, 21 खाण व खनिज अधिनियम, 1957 सह कलम 48(7), 48(8) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाळू उपसा करण्यासाठीच्या बोटी नष्ट करण्यात आल्या आहेत. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर हे करत आहेत.
सदर कारवाईमुळे, कौडगांव येथील गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले असून, उपसा केलेली वाळू नांदेड जिल्हयासह शेजारील जिल्हयांमध्ये पुरवठा होत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
सदर कारवाईत, पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेकॉ/ प्रदिप खानसोळे, पोहेकॉ संजीव जिंकलवाड, पोकॉ/ गणेश धुमाळ व पोकों / कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. मागील काही दिवसांपासून सदर पथकाने अवैध व्यवसायांच्या विरुद्ध उल्लेखनीय व धाडशी कामगिरी केली असून, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.
आपल्या भागात चालणाऱ्या अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचविणे सोपे व्हावे म्हणून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली 'खबर' नावाची हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी जागरूक होऊन, आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.