जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी जिल्हा कृषी व धान्य महोत्सवात सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 12/03/2026 6:59 PM

नांदेड :- कृषी विभाग व आत्मा, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषी व धान्य महोत्सव 2026 चे आयोजन 15 ते 16 मार्च 2026 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा, नांदेड येथे करण्यात आले आहे.

या कृषी महोत्सवात कृषी प्रदर्शन, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठांचे स्टॉल, विविध कृषी तंत्रज्ञानाचे प्रदर्शन तसेच कृषी संलग्न शासकीय विभागांचे स्टॉल अशा सुमारे 100 स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर विविध विषयांवरील शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवाद, चर्चासत्रे, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, कृषी मालाचे प्रदर्शन तसेच खरेदीदार-विक्रेता संमेलन यांचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. महोत्सवाच्या ठिकाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला गहू, ज्वारी, तांदूळ, तूर, मूग, उडीद, चनाडाळ, हळद, मिरची, मसाले तसेच गूळ, हळद पावडर, सेंद्रीय डाळी यांसारखी सेंद्रीय उत्पादने उपलब्ध राहणार आहेत.

तसेच मध, गुळाचा पाक, महिला बचत गटांची चटणी, लोणचे, पापड, कुरडई, टरबूज, खरबूज यांसारखी फळे व विविध भाजीपाला थेट विक्रीसाठी उपलब्ध राहतील. याशिवाय जात्यावरची सेंद्रीय डाळ, गोदाकाठची ज्वारी, सेंद्रीय हिरव्या भाज्या, फळभाज्या, रानफळे तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले लाकडी घाण्याचे करडई, भुईमूग, जवस व तिळाचे तेल, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू, केळीचे वेफर्स, डिंक व बिब्याची गोडंबी यांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.

या महोत्सवाला शहरातील नागरिक व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भेट देऊन शेतमाल खरेदीद्वारे स्थानिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या