कुपवाडच्या चाणक्य चौकात मनपा अतिक्रमण विभागाची धड़क कारवाई

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 13/03/2026 12:14 AM

*** ३६ खोकी आणि पत्रा शेड जमीनदोस्त

  विभागीय क्षेत्रीय कार्यालय क्र. ३ (कुपवाड) आणि अतिक्रमण पथकाची संयुक्त मोहीम; व्यावसायिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद

 सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात रस्ते मोकळे करण्यासाठी प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. आज कुपवाड रोडवरील वर्दळीच्या चाणक्य चौकात अतिक्रमण निर्मूलन पथकाने मोठी कारवाई करत विनापरवाना उभारलेली ३६ खोकी आणि पत्र्याचे गळे हटवले. या कारवाईमुळे चाणक्य चौक परिसरातील मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून वाहतुकीचा अडथळा दूर झाला आहे.

सदर कारवाई आयुक्त श्री. सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय क्षेत्रीय कार्यालय क्र. ३ (कुपवाड) आणि अतिक्रमण विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे करण्यात आली.

चाणक्य चौक कुपवाड येथे अनधिकृतपणे पत्र्याची शेड आणि लाकडी खोके उभारून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. या मोहिमेत एकूण ३६ खोक्यांवर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही व्यवसायधारकांनी कारवाईपूर्वीच आपली खोकी स्वतःहून काढून घेतली, तर उर्वरित बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने हटवण्यात आली.

  सहाय्यक आयुक्त तथा अतिक्रमण निर्मूलन पथक अधीक्षक श्री. नागार्जुन मद्रासी आणि विभागीय क्षेत्रीय कार्यालय क्र. ३ चे सहाय्यक आयुक्त श्री. सचिन सागावकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या मोहिमेचे नेतृत्व केले.

  नगररचना (Town Planning) विभागाचे सर्व अधिकारी, स्वच्छता अधिकारी श्री. सिद्धांत ठोकळे, स्वच्छता निरीक्षक (SI) आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी या कारवाईत सक्रिय सहभागी होते.
    
 जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृत बांधकामे हटवली:
कुपवाड रोड,चाणक्य चौक परिसरात रस्त्याला अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे काढताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. 

     "अतिक्रमणमुक्त शहर हेच आमचे ध्येय" - महापालिका आयुक्त 

यावेळी बोलताना आयुक्त श्री. सत्यम गांधी यांनी स्पष्ट केले की,
> "शहरातील मुख्य चौक आणि रस्ते वाहतुकीसाठी मोकळे राहणे आवश्यक आहे. ज्या व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढले, त्यांचे आम्ही स्वागत करतो. यापुढेही अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध 'झिरो टॉलरन्स' धोरण राबवून धडक कारवाई सुरूच राहील."


महानगरपालिका प्रशासनाने सर्व व्यावसायिकांना आवाहन केले आहे की, रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत विनापरवाना खोके अथवा शेड उभी करू नयेत. शहराच्या सुशोभीकरणात आणि शिस्तीत सहकार्य करावे, अन्यथा जप्तीसह कडक कायदेशीर  कारवाई केली जाईल.




Share

Other News

ताज्या बातम्या