नांदेडमध्ये मिनी सरस रेणुका महोत्सवाचे उद्घाटन; 13 ते 18 मार्चदरम्यान सर्वांसाठी विक्री प्रदर्शन खुले

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 13/03/2026 7:45 PM

नांदेड -  मोठ्या शहरांमधील आर्थिक वाढ ही ग्रामीण भागावरच अवलंबून आहे. ग्रामीण भागातून शेतीमाल खरेदी करून त्याची स्वच्छता व आकर्षक पॅकिंग करून विक्री केली जाते. त्याचप्रमाणे आर्थिक उन्नतीसाठी उमेदच्या स्वयंसहायता गटांनीही आपल्या उत्पादित मालाचे योग्य व आकर्षक पॅकिंग करून वस्तू बाजारात आणल्यास निश्चितच उन्नती होईल, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले.
     नांदेड येथील मल्टीपर्पज हायस्कूल येथे उमेद अंतर्गत जिल्हास्तरीय मिनी सरस रेणुका महोत्सव व विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, राज्य अभियान व्यवस्थापक रामदास धुमाळ, माजी जिल्हा परिषद सदस्या पूनम पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, अमित राठोड, मयूरकुमार आंदेलवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले, कार्यकारी अभियंता संजय शिंदे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, गट विकास अधिकारी वैष्णव, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक बालाजी नागमवाड, शुभम तेलेवाड, साईचरण, व्‍दारकादास राठोड आदींची उपस्थिती होती.
      पुढे बोलताना मेघना कावली म्हणाल्या, जिल्हा व राज्यस्तरीय विक्री प्रदर्शनातून स्वयंसहायता गटांनी योग्य पद्धतीने मार्केटिंग करणे आवश्यक आहे. वस्तूंची किंमत, आकर्षक पॅकिंग तसेच त्या वस्तूंची नागरिकांना असलेली गरज या बाबींचा अभ्यास करणे गरजेचे आहे. स्वयंसहायता गटांच्या सक्षमीकरणासाठी हे महत्त्वाचे ठरेल. यावेळी त्यांनी बिहारमधील जीविका तसेच केरळमधील कुडुंबश्री योजनांचा उल्लेख करत नांदेड जिल्ह्यातील रेणुका ब्रँड विकसित करण्यासाठी उमेदमार्फत प्रयत्न करावेत, असेही सांगितले. दिनांक 13 ते 18 मार्चदरम्यान चालणाऱ्या या महोत्सवाला जास्तीत जास्त महिला व नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
      कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांनी प्रास्ताविक करून जिल्हास्तरीय मिनी सरस रेणुका महोत्सवाच्या आयोजनाची माहिती दिली. या प्रदर्शनात सुमारे शंभर स्वयंसहायता गटांचे वस्तू विक्रीचे स्टॉल सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. माजी जिल्हा परिषद सदस्या पूनम पवार यांनीही मनोगत व्यक्त करत बचत गटांनी आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले असून त्यांच्या उद्योगांना आता बँकाही कर्ज देण्यास पुढे येत असल्याचे सांगितले.
      राज्य अभियान व्यवस्थापक तथा नांदेडचे पालक अधिकारी रामदास धुमाळ यांनी राज्यात उमेदच्या माध्यमातून सुमारे 71 लाख महिला जोडल्या गेल्याची माहिती दिली. स्वयंसहायता गटांमुळे महिलांना आर्थिक बळ मिळाले असून आता गटांसोबत वैयक्तिक उद्योगांवरही भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातही महिलांची निर्णयक्षमता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
    कार्यक्रमाच्या उद्घाटना पूर्वी निवासी अंध विद्यालय वसरणी येथील विद्यार्थी वृंदा व संगीत दिग्दर्शक पंकज शिरभाते व विद्यार्थी यांनी स्फूर्तीदायक व प्रेरणादायी गीते गाऊन सर्वांची मने जिंकली आणि स्वागत गीत म्हणून आनंदाने अंतर फुलले सहज शब्द उमगले हे गीत गाऊन सर्वांना आनंदित केले. याप्रसंगी विनोदी वासरे यांनी बासरी वादनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इरवंत सूर्यकार व स्मिता मोहरीर यांनी केले. तर आभार व्‍दारकादास राठोड यांनी मानले.
या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातून व अन्य जिल्ह्यातून 100 विविध प्रकारचे विक्री स्टॉल उपलब्ध झालेली आहे त्याचबरोबर या विक्री प्रदर्शनामध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर हे सामाजिक उपक्रम सुद्धा पुढील पाच दिवस राबवले जात आहे. 
     उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक व्‍दारकादास राठोड, जिल्हा व्यवस्थापक गणेश कवडेवार, बालाप्रसाद जंगीलवाड, माधव भिसे, अरुण चव्हाण, जिल्हा कौशल्य व्यवस्थापक आशिष गायकवाड, तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील तालुका अभियान व्यवस्थापक सर्व, तालुका व्यवस्थापक सर्व, प्रभाग समन्वयक आदींची उपस्थिती होती.

चौकट  
मिनी सरस महोत्सवात विविध उत्पादनांचे प्रदर्शन

उमेदच्या वतीने नांदेड येथे जिल्हास्तरीय मिनी सरस रेणुका महोत्सव व विक्री प्रदर्शन 13 ते 18 मार्चदरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. दररोज सायंकाळी 6 ते 9 या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी तर उमेद अभियानातील महिलांसाठी दुपारी 1 ते 4 या वेळेत संगीत खुर्ची व होम मिनिस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

चौकट  
विविध खाद्यपदार्थ व हस्तकला वस्तूंची विक्री

या महोत्सवात महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थ व वस्तूंचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. यामध्ये बाजरीची खारोडी, व्हेज आम्लेट, अमरावतीची मांड्यावर मडक्यात तयार केलेली पुरणपोळी, बाजरीची भाकरी-बेसन-ठेचा, काजू, मँगो पल्प, पापड, कुरडई, विविध लोणची, मसाले, शेवया, नाचणीचे पदार्थ, डाळी, मनुका आदी पदार्थांचा समावेश आहे. तसेच घोंगडी, बंजारा ड्रेस, कोल्हापुरी चप्पल, पुरुषांचे कपडे, साड्या, खेळणी, घर सजावटीच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधने, बेन्टेक्स दागिने, हस्तनिर्मित वस्तू, जयपुरी टोपी, लाकडी वस्तू व भांडी आदी विविध वस्तूही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या