आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे )
दहिवडी:
शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेव यात्रेचा समारोप यंदा अभूतपूर्व उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. शनिवारी मुंगीघाटात पार पडलेल्या कावड सोहळ्याने संपूर्ण परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा भक्तीचा महासागर ठरला.
मानाच्या कावडी चढविताना भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. रात्री उशिरा सासवड येथील भुतोजीबुवा तेली यांच्या मानाच्या कावडीने शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्यानंतर यात्रेची सांगता झाली.
चैत्र शुद्ध पंचमीला शिवपार्वती हळदी सोहळ्याने यात्रेला प्रारंभ झाला होता. अष्टमीला शिवपार्वती विवाहसोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. याच दिवशी शंभू महादेव मंदिर ते बळी मंदिरापर्यंत मानाचे पागोटे (धज) बांधण्याचा सोहळा मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. नवमीला उस्मानाबाद जिल्ह्यातील भातांगळी येथील मानाच्या काठीने दर्शन घेतले, तर एकादशीला लाखो भाविकांनी उपवास ठेवत महादेवाचे दर्शन घेतले. सायंकाळी इंदोर राजघराण्यातील काळगावडे राजे यांनी घोड्यावरून येत दर्शन घेतल्याने आकर्षण वाढले.
शिंगणापूर यात्रेत कावड सोहळ्याला विशेष महत्त्व असून, त्यामुळे ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात कावड यात्रा म्हणून ओळखली जाते. द्वादशीच्या दिवशी सकाळपासूनच पुष्कर तलावातील जलतीर्थ घेऊन हजारो कावडी पायरी मार्गाने येत जलाभिषेकासाठी दाखल झाल्या.
मुंगीघाटातील कावड सोहळ्याचा थरार पाहण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. फलटण, बारामती, इंदापूर, माळशिरस तसेच सासवड पंचक्रोशीतील विविध गावांमधून आलेल्या मानाच्या कावडी मोठ्या उत्साहात मुंगीघाट चढताना दिसून आल्या. भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा संगम असलेल्या या सोहळ्याने यंदाची शिंगणापूर यात्रा अविस्मरणीय ठरली.