जिल्हयात ११ डॉग शेल्टरसाठी पावणेपाच कोटीची भरीव तरतुद

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 30/03/2026 9:23 PM

- महापालिकेसह जिल्ह्यातील 10 नगरपरिषद, नगरपंचायतींचा समावेश
- भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजना

सांगली, दि. 30
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी जिल्ह्यात महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून 11 डॉग शेल्टर उभारण्यासाठी तब्बल 4 कोटी 74 लाख 86 हजार 620 रूपयांच्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हा स्तर) योजनेतून याबाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेसह जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व नगरपंचायतींचा या उपक्रमात समावेश असून भटक्‌या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी निवारा, निर्बीजीकरण आणि लसीकरण या तिन्ही पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हा स्तर) योजनेतून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका व जिल्ह्यातील 10 नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात डॉग शेल्टर बांधण्यासाठी 4 कोटी 74 लाख 86 हजार 620 रूपयांच्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रासाठी एकूण 2 कोटी 51 लाख 80 हजार 402 रूपये व जिल्ह्यातील एकूण 10 नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी 2 कोटी 23 लाख 6 हजार 218 रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेसह आटपाडी, आष्टा, उरूण-ईश्वरपूर, कडेगाव, कवठेमहांकाळ, जत, तासगाव, पलूस, विटा आणि शिराळा येथे भटक्या कुत्र्यांसाठी निवारा शेड (डॉग शेल्टर) उभे केले जाणार आहेत. यासाठीच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.  

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मा. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण आदिंबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या सभेत तत्कालिन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भटक्या श्वानांच्या संदर्भात सर्व संबंधित विभाग/अंमलबजावणी यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याबाबत सूचित केले होते.

भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणणे, त्यांचे लसीकरण, तसेच सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे या अनुषंगाने हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. यामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात सांगलीवाडी येथे डॉग पॉन्ड व डॉग शेल्टर उभारण्यासाठी राज्य शासनाच्या 70 टक्के अनुदानानुसार 1 कोटी 76 लाख 26 हजार 281 रूपये व महानगरपालिकेच्या 30 टक्के हिश्श्यानुसार 75 लाख, 54 हजार, 121 रूपये अशा एकूण 2 कोटी 51 लाख 80 हजार 402 रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण 10 नगरपालिका क्षेत्रात ॲनिमल बर्थ कंट्रोल (एबीसी) केंद्र व भटक्या कुत्र्यांसाठी स्थायी विशेष निवारा केंद्र उभारण्यासाठी एकूण  2 कोटी 23 लाख 6 हजार 218 रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

यामध्ये आटपाडी नगरपंचायत क्षेत्रासाठी 15 लाख 52 हजार 399 रूपये, आष्टा नगरपरिषद क्षेत्रासाठी 20 लाख 12 हजार 901 रूपये, उरूण ईश्वरपूर नगरपरिषद क्षेत्रासाठी 29 लाख 74 हजार 52 रूपये, कडेगाव नगरपंचायत क्षेत्रासाठी 17 लाख 95 हजार 577 रूपये, कवठेमहांकाळ नगरपंचायत क्षेत्रासाठी 11 लाख 67 हजार 809 रूपये, जत नगरपरिषद क्षेत्रासाठी 37 लाख 5 हजार 20 रूपये, तासगाव नगरपरिषद क्षेत्रासाठी 18 लाख 43 हजार 933 रूपये, पलूस नगरपरिषद क्षेत्रासाठी 15 लाख 29 हजार 647 रूपये, विटा नगरपरिषद क्षेत्रासाठी 44 लाख 85 हजार 576 रूपये, शिराळा नगरपंचायत क्षेत्रासाठी 12 लाख 39 हजार 304 रूपये अशा एकूण 2 कोटी 23 लाख 6 हजार 218 रूपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.

डॉग शेल्टरच्या प्रस्तावित कामांची जागा, कामाची गुणवत्ता आदिंबाबत नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रांतर्गत भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी निधीची तरतूद केली असली तरी डॉग शेल्टरचे व्यवस्थापन व त्याअनुषंगिक खर्च संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी करायचा आहे. 

या प्रकल्पामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणणे, त्यांचे लसीकरण सुनिश्चित करणे आणि सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे शक्य होणार असून, नागरिकांच्या सुरक्षेलाही मोठा दिलासा मिळणार आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या