नांदेड :- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत मुख्यालयाच्या सूचनांनुसार दिनांक 22.03.2026 ते 28.03.2026 या कालावधीत रेल्वे गाड्या व स्थानकांवर अनधिकृत विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा उद्देश अनधिकृत विक्रीला आळा घालणे तसेच प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ व नियमानुसार सेवा उपलब्ध करून देणे हा होता.
या मोहिमेदरम्यान वाणिज्य निरीक्षक व तिकीट तपासणी कर्मचारी यांनी विभागातील विविध मार्गांवर सघन तपासणी केली. त्यामध्ये वाशीम–अकोला, परभणी–परतूर, परभणी–परळी, जालना–छत्रपती संभाजीनगर, नांदेड–आदिलाबाद, नांदेड–वाशीम तसेच छत्रपती संभाजीनगर–मनमाड या विभागांचा समावेश होता.
या संयुक्त कारवाईदरम्यान एकूण 35 अनधिकृत विक्रेते/फेरीवाले आढळून आले असून त्यांच्यावर रेल्वे नियमांनुसार कारवाई करण्यात आली. या कारवाईत EFT द्वारे एकूण ₹13,860 इतका दंड वसूल करण्यात आला.
प्रवाशांना स्वच्छ व सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळावा, अनधिकृत व अस्वच्छ खाद्यपदार्थांची विक्री रोखावी आणि स्थानक व रेल्वे गाड्यांमध्ये शिस्त राखावी यासाठी नांदेड विभागाकडून अशा प्रकारच्या मोहिमा नियमितपणे राबविण्यात येत असतात.
दक्षिण मध्य रेल्वे प्रवाशांना आवाहन करते की त्यांनी फक्त अधिकृत विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ खरेदी करावेत तसेच रेल्वे स्थानके व गाड्यांमध्ये स्वच्छता, शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे.