नांदेडः शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने साजरी होत असलेल्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या स्वागताध्यक्षपदी भाजपाचे महानगराध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर यांची आज येथे निवड करण्यात आली.
जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती महोत्सव मागील 25 वर्षांपासून महाराष्ट्रात साजरा करण्यात येतो. ही जयंती शासकीय पातळीवर साजरी होण्यात ‘शिवा’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. या वर्षीचे हे रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष असल्यामुळे मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरी व्हावी यासाठी प्रा. मनोहर धोंडे यांच्या सूचनेवरून ‘शिवा’च्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक संपन्न झाली. या बैठकीत माजी आमदार राजूरकर यांनी स्वागताध्यक्षपद स्विकारावे, अशी विनंती करण्यात आली. ही जबाबदारी स्विकारून राजूरकर यांनी मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा करण्यात येईल, असा मनोदय व्यक्त केला.
यावेळी अमरनाथ राजूरकर यांच्या समवेत भाजपाचे जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे, ‘शिवा’चे राज्य उपाध्यक्ष वैजनाथ तोंडसुरे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष विठ्ठल ताकबिडे, राज्य सरचिटणीस संजय कोठाळे, जिल्हा संपर्क प्रमुख इंजि. आनंद माळगे, जिल्हाध्यक्ष विलास कापसे, महानगराध्यक्ष गजानन कानडे, धार्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर स्वामी, उपाध्यक्ष संग्राम काडवदे, नागोराव पाटणी, शिवराज उमाटे, बालाजी दिग्रसकर, काशीनाथ पटने, पिंटू स्वामी, विठ्ठल आळंदे, प्रशांत माळगे, वैभव तमशेटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.