शाळांचा शिक्षणाऐवजी 'बाजार' : पालकांवर ठराविक दुकानांतून खरेदीसाठी दबाव?

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 12/06/2026 8:30 AM



आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

सातारा प्रतिनिधी | विशेष वृत्त
१५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असताना अनेक खासगी शाळांमध्ये शालेय गणवेश, नवीन पाठ्यपुस्तके, वह्या तसेच विद्यार्थ्यांना लागणारे इतर साहित्य ठराविक दुकानांतूनच खरेदी करण्यासाठी पालकांवर दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात काही शाळा संस्थांनी अक्षरशः बाजार मांडल्याचा आरोप संतप्त पालकांकडून केला जात आहे.
शाळांकडून पालकांना विशिष्ट दुकानांची नावे देऊन त्याच ठिकाणाहून गणवेश, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याच्या सूचना केल्या जात आहेत. काही ठिकाणी इतर दुकानांतून साहित्य खरेदी केल्यास ते स्वीकारले जाणार नाही, अशी अप्रत्यक्ष भीतीही पालकांमध्ये निर्माण केली जात
असल्याचे बोलले जात आहे.
आधीच वाढती महागाई, शैक्षणिक शुल्काचा बोजा आणि इतर खर्चामुळे पालक आर्थिक अडचणीत असताना अशा सक्तीमुळे त्यांची कोंडी होत आहे. खुल्या बाजारात कमी दरात उपलब्ध होणारे साहित्य ठराविक दुकानांत मात्र जास्त किमतीत विकले जात असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन आणि संबंधित दुकानदार यांच्यातील आर्थिक हितसंबंधांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पालकांची मागणी आहे की, शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेऊन अशा प्रकारच्या सक्तीला आळा घालावा. विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत पालकांना त्यांच्या सोयीच्या आणि परवडणाऱ्या दुकानांतून साहित्य खरेदी करण्याचे स्वातंत्र्य मिळावे.
"शिक्षण मंदिर की बाजार?" असा संतप्त सवाल आता पालकांकडून उपस्थित केला जात असून, संबंधित प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या