नांदेड : नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हास्तरीय मान्सून-2026 पूर्व तयारी- पूर परिस्थीतीमध्ये करावयाचे शोध व बचाव कार्याबाबत रंगीत तालिम सराव सत्र काळेश्वर घाट विष्णुपुरी नांदेड येथे आज संपन्न झाले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शन व प्रमुख उपस्थितीत सदर रंगीत तालीम सराव सत्र संपन्न झाले.
या रंगीत तालीममध्ये पूर परिस्थितीमध्ये शोध व बचाव कार्य कसे करायचे, काय पुर्व तयारी करायची, आयआरबी बोट कशी असेंबल करायची तसेच पुर परिस्थितीमध्ये शोध व बचाव कार्यास आवश्यक साहित्य परिचय तसेच ते साहित्य कशाप्रकारे हाताळायचे याबाबत प्रशिक्षण व प्रत्यक्ष हाताळण्याबाबत सराव देण्यात आले. सदर रंगीत तालिमेत प्रशिक्षण हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड अंतर्गत असलेले अग्नीशमन दल, नांदेड पोलीस शिघ्र प्रतिसाद दल, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे वैद्यकीय पथक, तहसिल कार्यालय नांदेड यांच्याकडुन संयुक्त समन्वयातून देण्यात आले.
यावेळी नांदेड शहर महानगरपालिकेच्यावतीने अग्नीशमन अधिकारी केरोजी दासरे यांच्यासोबत उपअग्नीशमन अधिकारी निलेश कांबळे यांनी आयआरबी बोट कशी असेंबल करायची व पूर परिस्थितीमध्ये शोध व बचाव कार्य कसे करायचे व त्याकरीता कोणती साहित्य वापरायची याबाबत सखोल मार्गदर्शन केले, पोलिस विभागाच्यावतीने उपअधिक्षक शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पीआय दर्शने यांच्यासह क्युआरटीचे ज्ञानोबा चोंडे यांनी पोलिस शिघ्र प्रतिसाद दला कडून मागील वर्षी करण्यात आलेल्या शोध व बचाव कार्याबाबतची माहिती दिली तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत डॉ. सुनील कुलकर्णी व सचिन कोताकोंडावार यांनी सिपिआर बाबत सखोल माहिती दिली व प्रत्यक्ष सराव प्रात्याक्षीक करुन घेतले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी मागील वर्षी शोध व बचाव कार्य चांगल्या पध्दतीने केल्याबद्दल सर्व संबंधीत यंत्रणांचे कौतुक केले. यावर्षी सर्वानी प्रशिक्षीत होऊन एकमेंकाच्या समन्वयातून आपण मान्सून 2026 करीता चांगल्या पध्दतीने तयारी करु या सज्ज राहुया असे मनोगत व्यक्त केले. विठ्ठल परळीकर तहसिलदार लोहा, संजय वारकड तहसिलदार नांदेड यांनी मागील वर्षीचे पुर शोध व बचाव कार्याबाबतचे अनुभव मांडले तसेच यावर्षीच्या मान्सून करीता आपण सर्व तयारीनिशी सज्ज राहावे असे मनोगत व्यक्त केले. तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जगदीश कांबळे व डॉ.प्रवीण मुंडे यांनी मान्सून मध्ये आरोग्याची कशी दक्षता घ्यावी, पाणी शुध्दीकरण व पूर परिस्थिती नंतर घ्यावयाची काळजी बाबत तसेच गरोदर महिलाबाबत काय दक्षता घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले, सदर रंगीत तालिम प्रशिक्षणाचे समन्वाची भुमिका किशोर कु-हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी पार पाडली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नायब तहसिलदार सुनिल माचेवाड यांनी केले तर प्रास्तवीक गौरव तिवारी डीडीएमएस, आभार प्रदर्शन बारकुजी मोरे महसूल सहायक यांनी केले. यावेळी नांदेड जिल्हयातील सोळा तहसिल कार्यालय, पंचायत समिती, कृषी, आरोग्य, नगरपालिका, पोलिस विभागातील जवळपास अडीचशे ते तिनशे अधिकारी कर्मचारी यांनी या प्रशिक्षणात सक्रीय सहभाग घेतला. सदर रंगीत तालिम यशस्वी करण्याकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व तहसिल कार्यालय नांदेडच्या अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.