नांदेड ; राजकारणात अनेकदा आश्वासनांची चर्चा होते; मात्र प्रत्यक्ष कृतीतून माणुसकी जपणारे नेते विरळाच असतात. नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंढारकर यांनी शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांना कठीण प्रसंगी केलेल्या मदतीमुळे त्यांच्याविषयी सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे.
गेल्या काही महिन्यांत प्रल्हाद इंगोले या कार्यकर्त्यावर संकटांचा डोंगर कोसळला होता. एका अपघातात पायाला गंभीर दुखापत होऊन अनेक फ्रॅक्चर झाले. त्यातून सावरत असतानाच १ जून रोजी त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. हृदयाला रक्तपुरवठा करणारी वाहिनी ९५ टक्क्यांहून अधिक ब्लॉक झाल्याने तातडीने अँजिओप्लास्टी करावी लागली. उपचारासाठी मोठा खर्च झाल्याने कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले होते.
दरम्यान, उपचार सुरू असताना अनेक मित्र, नातेवाईक आणि नेत्यांनी भेट देऊन विचारपूस केली. मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही दिवसांनी संबंधित कार्यकर्त्याला एक सुखद धक्का बसला. रुग्णालयाचे एक लाख रुपयांहून अधिक बाकी असलेले बिल आमदार आनंदराव बोंढारकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन भरल्याचे त्यांना समजले.
विशेष म्हणजे, आमदार बोंढारकर यांनी याबाबत कोणतीही प्रसिद्धी न करता, सोशल मीडियावर पोस्ट न टाकता किंवा कुठलाही गाजावाजा न करता ही मदत केली. रुग्णालयात भेट दिल्यानंतर त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून संबंधित रुग्णाच्या उपचारांची माहिती घेतली आणि सुमारे सव्वा लाख रुपयांचे बिल रोख स्वरूपात अदा केले. आमदारांची ही कृती पाहून डॉक्टरही अचंबित झाल्याचे सांगितले जात आहे.
संबंधित कार्यकर्त्याने आमदार बोंढारकर यांचे आभार व्यक्त करत, "ही मदत मी मनापासून स्वीकारत असून, योग्य वेळी ही रक्कम त्यांना सन्मानाने परत करणार आहे. त्यामुळे आणखी एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करता येईल," अशी भावना व्यक्त केली.
राजकीय क्षेत्रात निस्वार्थी मदतीची उदाहरणे कमी होत असताना, आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या या कृतीमुळे समाजात सकारात्मक संदेश गेला असून त्यांच्या माणुसकीची सर्वत्र चर्चा होत आहे. "चांगल्या कामांची चर्चा झाली पाहिजे, त्यातून समाजात चांगले काही करण्याची प्रेरणा मिळते," अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.