जामखेड | प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत काम करणाऱ्या तब्बल 4,426 मजुरांची ₹75.51 लाखांची मजुरी अद्यापही प्रलंबित आहे. संबंधित 15 Fund Transfer Orders (FTO) हे 29 मे आणि 1 जून 2026 रोजी तयार करण्यात आले असूनही अनेक मजुरांच्या खात्यात आजपर्यंत मजुरी जमा झालेली नाही.
राज्य मनरेगा कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, 18 जून 2026 रोजी राज्य शासनाचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आला आहे. मात्र केंद्र शासनाकडील निधी प्राप्त झाल्यानंतरच EFMS (Electronic Fund Management System) द्वारे मजुरांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे सध्या ही मजुरी केंद्र शासनाकडील निधी प्रलंबित असल्याने रखडल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, FTO Tracking System वर संबंधित FTO संदर्भात PD Sign Date, DDO Sign Date, PAO Sign Date तसेच Advice to Bank या नोंदी अनेक ठिकाणी "NA" असल्याने पेमेंट प्रक्रिया नेमक्या कोणत्या टप्प्यावर अडकली आहे, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
याप्रकरणी संबंधित प्रशासनाकडे सविस्तर स्पष्टीकरण मागविण्यात आले असून, केंद्र शासनाकडून निधी कधी उपलब्ध होणार आणि प्रलंबित मजुरी मजुरांच्या खात्यात कधी जमा होणार, याबाबत माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मनरेगा अंतर्गत वेळेवर मजुरी मिळणे हा प्रत्येक मजुराचा कायदेशीर हक्क आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने समन्वय साधून प्रलंबित निधी तातडीने उपलब्ध करून मजुरांची रखडलेली मजुरी त्वरित अदा करावी, अशी मागणी होत आहे.
#मनरेगा #MGNREGA #जामखेड #अहिल्यानगर #मनरेगामजुरी #प्रलंबितमजुरी #FTO #EFMS #केंद्रसरकार #ग्रामीणरोजगार #शेतमजूर #मनरेगाबातमी #मजुरीपेमेंट #सरकारीयोजना #PFMS #रोजगारहमीयोजना #महाराष्ट्र #Ahmednagar #Jamkhed #BreakingNews #AaplaSatyaAhilyanagar