नांदेड :- मराठवाड्यात पुरेसा पाऊस पडावा, पर्यावरण संवर्धनाला चालना मिळावी तसेच २७ वी अमरनाथ यात्रा निर्विघ्न व यशस्वी पार पडावी, या प्रार्थनेसाठी धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अमरनाथ यात्री संघ, भाजप महानगर नांदेड व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली २७ वी रत्नेश्वरी पाऊस दिंडी रविवारी उत्साहात संपन्न झाली. या दिंडीत नांदेड ते रत्नेश्वरी गड मार्गावर आणि गड परिसरात यात्रेकरूंनी हजारो बियांचे रोपण केले, तर सामाजिक वनीकरण विभाग, लोहा यांच्या सहकार्याने गडावर १०८ वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, दिंडीदरम्यान सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकला आणि त्याच रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे यात्रेकरूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.*
चौकटीतील क्षणचित्रे
------------------------
हजारो बियांचे रोपण,
गडावर १०८ वृक्षांचे वृक्षारोपण;
‘मन की बात’ अमरनाथ यात्री के साथ
त्याच रात्री मुसळधार पावसाने दिंडीला यशाची साक्ष
-------------------
रविवारी सकाळी ६ वाजता प्रतिष्ठित व्यापारी राजेश सुरतवाला यांच्या हस्ते पाऊस दिंडीला तिरंगा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी स्नेहलता जायस्वाल, नामदेव पतंगे, संजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. बालाजी मंदिराचे महंत कैलास महाराज वैष्णव यांच्या वतीने स्वादिष्ट पोहे व चहाचे वाटप करण्यात आले. बालाजी मंदिरतर्फे वंदना व हनुमानसिंग चौहान, अंजली अन्नपुरे, गंगामणी व बजरंग खंदारे यांच्या सह सर्वांचा सत्कार करण्यात आला.
ध्वनिक्षेपक असलेल्या रथासह ढोल-ताशांच्या गजरात दिंडीने मार्गक्रमण सुरू केले. श्रीराम मंदिर, लातूर फाटा, नांदेड येथे पवन गुरुखुदे यांनी अल्पोपहाराचे वाटप केले. शोभा व नारायणसिंग चव्हाण, संगीता व प्रशांत जोशी तसेच सर्व यात्रेकरूंचे रामदस्ती देऊन स्वागत केले. मदनेश्वरी व सुभाष देवकत्ते, मंगला व नामदेवराव पांचाळ, मीरा व जयप्रकाश येवले यांच्या हस्ते आरती करण्यात आली.विश्वेश्वर महादेव चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे राधा व किशन चव्हाण, दिगंबर कोटलवार, बाबुराव केंद्रे, शिवमाला व विश्वनाथ खेडकर यांचा सन्मान करण्यात आला. संजय जाधव पाटील यांनी ‘येवले चहा’ची व्यवस्था केली होती. पुढे ईश्वर धाबा यांच्या वतीने सर्व यात्रेकरूंना मिनरल वॉटरचे वितरण करण्यात आले.
विष्णुपुरी येथे दिंडी पोहोचताच भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली. सुनील हंबर्डे, विश्वनाथ स्वामी, संतोष कदम यांनी शर्मिला होट्टे, गंगाधर मुंगल, श्रीकांत अकोलकर, सुनिता देशमुख या यात्रेकरूंचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यानंतर नानकसर गुरुद्वाराचे दर्शन घेऊन छाया चौधरी, मेधा व रंजीत धर्मापुरीकर, मीना झुंझारे यांच्या सह सर्वांनी अरदास केली.
झरी येथे सचिन माधवराव पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे स्वादिष्ट पोहे व चहाची व्यवस्था केली होती. सकाळी अकरा वाजता झरी येथील कॉलेजच्या सभागृहात सर्वांनी रेडिओवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकला. यावेळी सपना व सुनील अग्रवाल, सुमनबाई गिरे, सचिन पाटील, उत्तमराव गिरे, प्रभाकर ढोळे, माधवराव जाधव, शंकरराव पोलीस पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
रत्नेश्वरी गड चढण्यापूर्वी राजू कोकुलवार यांनी सर्वांना उसाचा रस पाजून नवीन ऊर्जा दिली. गड चढताना यात्रेकरूंनी सोबत आणलेल्या जांभूळ, सिताफळ, लिंबोळी, कोयी तसेच इतर विविध वृक्षांच्या हजारो बिया जागोजागी पेरल्या. सामाजिक वनीकरण विभागीय वनरक्षक संदीप चव्हाण, रेंजर शंकर आईनवाड व लोहा वनपाल व्ही.एस. गोरलावाड यांच्या सहकार्याने गडावर १०८ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावले.
गेल्या तीन महिन्यांपासून नियमित पायी चालण्याचा सराव केल्यामुळे गौरी देवकत्ते, भाग्यश्री पांचाळ, अनुजा व अपूर्वा झुंझारे, आराध्या व अनया येवले या चिमुकल्यांसह सर्व यात्रेकरूंनी १८ किलोमीटरचे अंतर सहज पूर्ण केले. साईप्रसाद हळदे, प्रशांत होट्टे, साईप्रसाद देवकत्ते यांनी अनवाणी चालत सर्वांना आश्चर्यचकित केले.
जयश्री व दिलीप ठाकूर यांच्या हस्ते रत्नेश्वरी मातेची महाआरती करण्यात आली. मराठवाड्यात भरपूर पाऊस पडावा आणि अमरनाथ यात्रा यशस्वी व्हावी, अशी सामूहिक प्रार्थना यावेळी करण्यात आली. आरतीनंतर प्रसिद्ध समाजसेविका जयश्री जायस्वाल यांच्या वतीने रस-पुरणपोळीच्या महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला. अन्नपूर्णा माता मंदिराच्या अध्यक्षा सुषमा व विजयसिंह गहेरवार, पूजा बिसेन, गुरुसिंग चव्हाण, संजय शर्मा, मदन पांडे यांनी देवीची चुनरी बांधून यात्रेकरूंचा सन्मान केला.समारोपप्रसंगी अनिता व अनिल चिद्रावार, निर्मला व द्वारकादास अग्रवाल, अलका व अनिल पांपटवार, श्रीराम विजापूरे यांची प्रमुख उपस्थिती होती.पाऊस दिंडी यशस्वी करण्यासाठी राजेशसिंह ठाकूर, सविता व अरुण काबरा, कालिदास निरने, संतोष बच्चेवार, दत्ता काका जांगीलवाड, सचिन जोगदंड, खंडू खंडागळे, संतोष भारती यांनी विशेष परिश्रम घेतले.
गेल्या २६ वर्षांपासून सातत्याने नांदेड ते रत्नेश्वरी मार्गावर व गड परिसरात बियांचे रोपण आणि वृक्षसंवर्धनाची चळवळ राबविल्यामुळे आज या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष उभे राहिले आहेत. या पर्यावरणपूरक उपक्रमाबद्दल धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व अमरनाथ यात्रेकरूंचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.