मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमित हातगाड्यांवर मनपाची कारवाई; चालकावर गुन्हा दाखल

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 29/06/2026 8:11 PM

नांदेड : नांदेड शहरातील मुख्य बाजारपेठा आणि शासकीय कार्यालय परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोइफोडे* यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन पथकाने सोमवारी दि.२९.०६.२०२६ रोजी विशेष धडक मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानालगतच्या मुख्य रस्त्यावर बेकायदेशीरपणे हातगाडी लावून वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण करणाऱ्या *शेख सोहेल शेख ताजोदिन* या फळविक्रेत्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी निवासस्थानालगतचा मुख्य रस्त्यावर संबंधित फळविक्रेत्याने मुख्य रस्त्याचा मोठा भाग व्यापून अवैध अतिक्रमण केले होते, ज्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.मनपाचे अतिक्रमण निर्मूलन पथक पोलीस बंदोबस्तासह कारवाईसाठी पोहोचले असता, संबंधित हातगाडा चालकाने स्वतःच्या गाडीवरील सर्व फळे रस्त्यावर फेकून देऊन गोंधळ निर्माण केला. मनपा कर्मचाऱ्यांनी तातडीने जेसीबीच्या साहाय्याने संबंधित अतिक्रमित हातगाडी निष्कासित करून रस्त्यावरून पूर्णपणे बाजूला केली व रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

सदर कारवाईदरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून रोखणे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी मनपा प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. संबंधित फळविक्रेत्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणास्तव भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार कलम २२१ अन्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एन.सी.आर. क्र.०२३९/२०२६ अन्वये दि.२९.०६.२०२६ रोजी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. सदरील कारवाई *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या आदेशाने *अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी नगर क्षेत्रिय कार्यालयाचे क्षे‍त्रिय अधिकारी रमेश चवरे, अतिक्रमण पथक प्रमुख दत्ता कल्याणकर, राजकिरण दवणे व त्यांच्या अतिक्रमण पथकाने पार पाडली आहे.

*मनपा प्रशासनाचा इशारा*
शहरातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांवर बेकायदेशीरपणे हातगाड्या लावून किंवा दुकानांचे साहित्य बाहेर काढून वाहतुकीची कोंडी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. सर्व व्यापारी आणि हातगाडा चालकांनी आपले व्यवसाय अधिकृत हद्दीतच करावेत. अतिक्रमण न हटवल्यास दंड ठोकण्यासह साहित्य जप्त केले जाईल आणि शासकीय कामात अडथळा आणल्यास थेट पोलिसांत गुन्हे दाखल केले जातील असा इशारा *मनपा उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांनी दिला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या