अर्धापूर :- श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, नांदेड संचलित श्री शारदा भवन हायस्कूल, अर्धापूर येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री, उत्कृष्ट प्रशासक, दूरदृष्टीचे राजकारणी आणि शिक्षणप्रेमी लोकनेते स्वर्गीय डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी व उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेत त्यांच्या कार्याला अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरुण कल्याणकर हे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी सांगितले की, "डॉ. शंकरराव चव्हाण यांनी शिक्षण, प्रशासन, ग्रामीण विकास, सामाजिक न्याय आणि लोककल्याणकारी शासनव्यवस्थेला दिलेली दिशा आजही समाजासाठी दीपस्तंभ आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रामाणिकपणा, शिस्त, राष्ट्रनिष्ठा आणि लोकसेवेच्या मूल्यांचा आदर्श घेऊन जीवनात यशस्वी नागरिक बनावे."
यावेळी श्री. प्रकाश कदम यांनी "डॉ. शंकरराव चव्हाण यांचे जीवन व कार्य" या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, डॉ. चव्हाण यांनी केवळ राजकारणातच नव्हे तर शिक्षण, सहकार, शेती, उद्योग, ग्रामीण विकास आणि प्रशासन या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून महाराष्ट्राच्या प्रगतीत अमूल्य योगदान दिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे नांदेड जिल्हा आज शिक्षणाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून ओळखला जात असून राज्यातील तसेच इतर राज्यांतील हजारो विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा त्यांनी दिलेला संदेश आजच्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन जी.बी. मदने यांनी केले.त्यांनी डॉ. चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, प्रामाणिकता, लोकाभिमुख नेतृत्व, शिक्षण ,कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेच्या भावनेचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी आर. एस. खांडरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील अनिल सवडतकर, एस. एस. डोईबोळे, आर. एम. खडकीकर, नागेश बोचकरी, बी. एम. मोकमपल्ले, ए. ए. राऊतवाड, एस. एम. दापकेकर, बी. जी. आवरे, आय. एस. शेख, वाय. जी. टिप्परसे, आत्माराम कदम, आर. जी. पाटील, आर. बी. लोकरे, एस. पी. भालेराव, पी. एस. तेलंग, डी. बी. पंडीत, व्ही. डी. काळे, एन. पी. केरूरकर, पी. डब्ल्यू. लोखंडे आणि व्ही. के. कवाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक प्रेरणा आणि आदर्श नेतृत्वाच्या विचारांनी भारावून गेले होते. अशा महापुरुषांच्या जयंतीचे आयोजन ही केवळ औपचारिकता नसून विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्य, शिस्त, कर्तव्यभावना, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रप्रेमाची मूल्ये रुजविण्याची प्रभावी संधी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या प्रेरणादायी कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात ज्ञान, प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि समाजहिताची वाट निवडण्याची नवी ऊर्जा मिळाली.