नांदेड:-विद्यार्थी हा विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या सर्व शैक्षणिक उपक्रमांचा केंद्रबिंदू असून, त्यांच्या सर्वांगीण हितासाठी विद्यापीठ सदैव कटिबद्ध आहे. विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये अधिक प्रभावी समन्वय निर्माण करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले.
विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात सोमवारी (दि.१३ जुलै, २०२६) आयोजित महाविद्यालयांच्या विविध प्रशासकीय व शैक्षणिक अडचणींच्या आढावा बैठकीत उपस्थित प्राचार्यांना मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासमवेत प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एम.के. पाटील, मानव्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.पराग खडके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, वित्त व लेखाधिकारी डॉ. राजेश शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.मारुती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. चासकर म्हणाले की, महाविद्यालयांच्या स्तरावर जशा विविध प्रशासकीय व शैक्षणिक अडचणी असतात, त्याचप्रमाणे विद्यापीठालाही मनुष्यबळ, परीक्षा नियोजन, प्राध्यापक मान्यता, अनुदान, दीक्षांत समारंभ तसेच विविध प्रशासकीय प्रक्रियांशी संबंधित अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. मात्र, या सर्व समस्यांवर नियोजनबद्ध आणि सकारात्मक पद्धतीने उपाययोजना करण्यात येत आहेत.
ते पुढे म्हणाले की, काही विषय राज्य शासनाकडे पाठविणे आवश्यक असते, काही विषय विद्यापीठाच्या विद्या परिषदेसमोर मांडावे लागतात, तर काही विषय व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतर अंतिम निर्णयासाठी ठेवावे लागतात. त्यामुळे प्रशासकीय प्रक्रियेस काहीसा कालावधी लागत असला तरी महाविद्यालयांकडून प्राप्त होणाऱ्या अडचणी शक्य तितक्या कमी वेळेत सोडविण्यास विद्यापीठ प्राधान्य देत आहे.
बैठकीदरम्यान उपस्थित प्राचार्यांनी महाविद्यालयीन स्तरावर भेडसावणाऱ्या विविध समस्या, सूचना व अपेक्षा याविषयी कुलगुरूंशी मनमोकळा संवाद साधला. या चर्चेतून अनेक विधायक सूचना समोर आल्या.
प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी प्राचार्यांनी मांडलेल्या सर्व सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यावर लवकरात लवकर आवश्यक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही दिली.
बैठकीचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारुती गायकवाड यांनी केले.