नांदेड :- खरीप हंगाम 2026 साठी जिल्ह्यात 4 लाख 56 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे नियोजन प्रस्तावित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्ह्यातील बियाणे निरीक्षकांना सोयाबीन बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
या अनुषंगाने जिल्ह्यातील बियाणे निरीक्षकांनी सोयाबीनचे 751 नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अप्रमाणित नमुन्यांच्या अहवालांच्या आधारे तसेच बियाणे उगवण न झाल्याबाबत प्राप्त तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीमार्फत पाहणी करण्यात आली. या पाहणीत बियाण्यांमध्ये दोष आढळून आल्याने संबंधित बियाणे उत्पादक व पुरवठादार कंपन्यांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955, बियाणे अधिनियम, 1966 मधील कलम 6, 7, 19, 21, बियाणे नियम, 1968 मधील नियम 23 तसेच भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 318(2) अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुन्हे दाखल करण्यात आलेल्या कंपन्याची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रा. लि., गेवराई बाजार, ता. बदनापूर, जि. जालना, पार्श्व जेनेटिक्स इंडिया, पेटलावाड, जि. झाबुआ (मध्य प्रदेश), रवी सीड्स अँड रिसर्च प्रा. लि., इंदौर (मध्य प्रदेश), एस.के.बी. सीड्स प्रा. लि., जानकी नगर, इंदूर (मध्य प्रदेश), एशियन सीड्स प्रा. लि., इंदौर, दप्तरी ॲग्रो प्रा. लि., ता. सेलू, जि. वर्धा या कंपन्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे जिल्हा परिषदेचे कृषि अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे यांनी दिली आहे.
ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, कृषी संचालक (निरीक्षण व गुणवत्ता नियंत्रण) श्री. बोरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड सचिन कपाळे आणि जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अमोल पेकम यांनी सहकार्य केले असून संबंधित तालुका बियाणे निरीक्षकांनी ही कारवाई केली आहे.