**२० ऑक्टोबरपासून ११४१९/११४२० क्रमांकाने धावणार*
मिरज : कोल्हापूर–पुणे मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. यापूर्वी ०१०२३/०१०२४ पुणे–कोल्हापूर–पुणे विशेष गाडी म्हणून धावणाऱ्या सेवेला आता नियमित करण्यात आले असून, २० ऑक्टोबर २०२६ पासून ही गाडी ११४१९/११४२० कोल्हापूर–पुणे–कोल्हापूर दैनिक एक्सप्रेस म्हणून नियमित धावणार आहे.
कोल्हापूर–पुणे मार्गावरील प्रवाशांची दीर्घकाळापासून असलेली मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे कोल्हापूर, मिरज, सांगली आणि पुणे परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
*नियमित सेवेमध्ये कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाडीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. कोल्हापूरहून ही गाडी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी सुटणार असून, मिरज येथे रात्री ११ वाजता सुटेल आणि पुणे येथे पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी पोहोचणार आहे.*
दरम्यान, पुणे येथून कोल्हापूरसाठी सुटणाऱ्या गाडीच्या वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे पुण्याहून कोल्हापूरकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
विशेष गाडीचे नियमित दैनिक एक्सप्रेसमध्ये रूपांतर झाल्यामुळे कोल्हापूर–पुणे मार्गावरील दैनंदिन प्रवाशांना अधिक नियमित आणि स्थिर रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
*रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे रेल्वे प्रवासी संस्था, मिरज जंक्शनचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पंडितराव कराडे (तात्या), मधुकर साळुंखे, वाय. सी. कुलकर्णी आदींनी स्वागत केले असून, प्रवाशांची मागणी मान्य केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.*
*दरम्यान, मध्य रेल्वे प्रादेशिक सल्लागार समितीचे सदस्य किशोर भोरावत यांनी या गाडीच्या नियमितीकरणाचे स्वागत करताना, नियमित सेवेसोबतच वेळापत्रकाचा प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने आढावा घेऊन आवश्यक ते बदल करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. कोल्हापूर–पुणे मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता या सेवेचा अधिकाधिक प्रवाशांना लाभ मिळेल, अशा पद्धतीने वेळापत्रक निश्चित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.*