प्रतीक्षेनंतर पाच पालकांना मिळाले हक्काचे बालक;जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मान्यतेने नात्यांतर्गत व सावत्र दत्तक प्रकरणांना अंतिम आदेश

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 10/09/2026 7:24 PM

नांदेड : आई-वडील होण्याची इच्छा मनाशी बाळगून दत्तक प्रक्रियेची प्रतीक्षा करणाऱ्या पालकांची अखेर प्रतीक्षा संपली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मान्यतेने नात्यांतर्गत व सावत्र दत्तक प्रक्रियेतील पाच प्रकरणांना एकाच दिवशी अंतिम मंजुरी देण्यात आली. त्यामुळे संबंधित पालकांना कायदेशीर प्रक्रियेतून हक्काचे बालक, तर बालकांना हक्काचे व सुरक्षित कुटुंब मिळाले आहे.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत या पाचही प्रकरणांची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांची प्रथम सीएआरए संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आली. त्यानंतर जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत गृहचौकशी करून प्रकरणे बाल कल्याण समितीसमोर सादर करण्यात आली. समितीची मान्यता मिळाल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
सीएआरए मार्गदर्शिका, २०२२ मधील मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित प्रकरणांना सीएआरए मार्फत ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले. त्यानंतर अंतिम आदेशासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या कक्षात सुनावणी घेण्यात आली. बालकांचे सर्वोत्तम हित या तत्त्वाला प्राधान्य देत सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर बालकांना त्यांच्या दत्तक पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. तसेच दत्तक विधानाचा अंतिम आदेश पारित करण्यात आला.
दि. ४ मे २०२६ पासून जिल्हाधिकाऱ्यांना दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यानुसार संबंधित प्रकरणांमध्ये दत्तक आदेशाची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. बालकांचे सुरक्षित व कुटुंबाधारित पुनर्वसन सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने ही कार्यवाही महत्त्वपूर्ण ठरली आहे. महिला व बाल विकास विभागाच्या सक्रिय सहभागातून राज्यभर दत्तक प्रक्रियेला गती देण्यात येत असून, बालकांना सुरक्षित कुटुंब मिळवून देण्याच्या या प्रक्रियेत महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरत आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दत्तक पालकांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. विधी सल्लागार ॲड. आनंद माळाकोळीकर यांच्या कायदेशीर मार्गदर्शनानुसार संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, बाल संरक्षण अधिकारी संदीप फुले आणि बाल विकास शाखेचे परिवीक्षा अधिकारी गजानन जिंदमवार यांनी या प्रक्रियेसाठी सहकार्य केले.

*कायदेशीर दत्तक प्रक्रियेतूनच बालक स्वीकारावे*

नात्यांतर्गत, सावत्र तसेच नियमित दत्तकग्रहणासाठी इच्छुक पालकांनी मिशन वात्सल्य पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करून कायदेशीर दत्तक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या