सांगली दि ६,
रोटरी क्लब ऑफ सांगली सिटी आणि स्नेहजित प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सांगली क्रीडा नगरी २०३०’ परिसंवादात सांगलीतील क्रीडाक्षेत्राच्या सद्यःस्थितीवर गंभीर चिंतन झाले. क्रीडा दिनानिमित्त झालेल्या या परिसंवादात क्रीडाविषयक धोरणे, प्रशासकीय अनास्था आणि सुविधांचा अभाव याबाबत मोकळेपणाने चर्चा होऊन क्रीडाक्षेत्राच्या पुनरुत्थानासाठी ठोस उपाययोजना सुचविण्यात आल्या.
परिसंवादाचे अध्यक्षपद रोटरी क्लब ऑफ सांगली सिटीचे अध्यक्ष विष्णु शिंदे यांनी भूषविले. स्नेहजित प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मती गौंडाजे तसेच प्रणव बिल्डकॉनचे प्रमुख किशोर पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वागत रोटरी क्लबचे सदस्य तथा स्नेहजित प्रतिष्ठानचे सचिव स्नेहल गौंडाजे यांनी केले.
परिसंवादात सांगलीच्या क्रीडाक्षेत्राला पुन्हा जोम येण्यासाठी प्रशासनाची धोरणे बदलणे, आर्थिक पाठबळ मिळणे, लोकसहभाग वाढवणे आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. यासाठी सर्व संबंधित घटकांनी संघटित होऊन प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
प्रा. जहांगीर तांबोळी यांनी सेवाभावी कार्यकर्त्यांच्या अभावामुळे क्रीडाक्षेत्रात मरगळ आल्याचे निरीक्षण नोंदविले.
शारीरिक शिक्षक संघटनेचे प्रा. वैभव पाटील यांनी जिल्हा क्रीडा संकुलातील सुविधांकडे होणाऱ्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले आणि तेथे सुविधा उपलब्ध झाल्यास सकारात्मक बदल शक्य असल्याचे सांगितले.
जितेंद्र पाटील यांनी शिवाजी क्रीडांगणाच्या विकासाबाबत प्रशासनाची आणि पदाधिकाऱ्यांची भूमिका अयोग्य असल्याचे स्पष्ट करताना क्रीडा शिक्षक संघटनेला कार्यालयासाठी जागा न दिल्याची खंत व्यक्त केली.
विनायक ऐनपुरे यांनी खेळ संघटनांना आर्थिक पाठबळ आणि जागेची उपलब्धता ही मूलभूत गरज असल्याचे सांगितले.
जिल्हा परिषद शाळेतील क्रीडा शिक्षक बाळू गायकवाड यांनी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या प्रतिभेचा उल्लेख करून सुविधांच्या आणि प्रशिक्षणाच्या अभावामुळे त्यांचा विकास खुंटत असल्याचे सांगितले.
स्नेहल गौंडाजे यांनी जिल्हा परिषद व नगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धांमधील सहभाग वाढविण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
शिवाजी स्टेडियमवर पन्नास वर्षे क्रिकेटचे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक विष्णु शिंदे यांनी क्रिकेट जोमात असताना इतर खेळांकडे पालकांची होणारी अनास्था ही चिंतेची बाब असल्याचे सांगितले.
प्रणव बिल्डकॉनचे किशोर पटवर्धन यांनी मिरजेत पटवर्धन ट्रस्टतर्फे उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा अकादमीची माहिती दिली आणि खेळाडू तसेच संघटनांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
आंतरराष्ट्रीय पंच रामकृष्ण चितळे यांनी जिल्ह्यातील क्रीडा संकुलांची निर्मिती, देखभाल, दुरुस्ती आणि वापर याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी सक्रिय भूमिका घ्यावी असे मत मांडले.
सन्मती गौंडाजे यांनी ‘सांगली क्रीडा नगरी २०३०’ या उपक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, जिल्ह्यातील क्रीडाविकासाला पुन्हा पाठबळ देणे आणि २०३६ च्या ऑलिंपिकमध्ये सांगली जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग कसा सुनिश्चित करता येईल, याबाबत चिंतन करणे हे या उपक्रमाचे मुख्य ध्येय आहे.
सांगली जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा एकत्रित डेटा उपलब्ध नसल्याची बाब परिसंवादात समोर आली.
यासाठी स्नेहजित प्रतिष्ठानने www.snehajeetpratishthan.org ही वेबसाइट उपलब्ध करून दिल्याची घोषणा स्नेहल गौंडाजे यांनी केली.
परिसंवादात असेही अधोरेखित झाले की, महापालिका पूर्वी क्रीडा संस्थांना थोडीफार आर्थिक मदत करीत होती; मात्र सध्या ती बंद झाली आहे. महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायती यांनी आपापल्या क्षेत्रातील नोंदणीकृत क्रीडा संस्थांना प्रतिवर्षी नियमित आर्थिक मदत देणे अत्यावश्यक आहे.
श्री. ऐनापुरे यांनी आभार प्रदर्शन केले.
प्रशासकीय धोरणांत सकारात्मक बदल झाल्यास सांगलीचे क्रीडाक्षेत्र पुन्हा एकदा जोमाने उभारी घेईल, अशा आशेसह परिसंवादाची सांगता झाली.
यावेळी रोटरी क्लब ऑफ सांगली सिटी व स्नेहजित प्रतिष्ठानच्या क्रीडा परिसंवादात सहभागी झालेले विष्णू शिंदे, किशोर पटवर्धन, सन्मती गौंडाजे यांच्यासह क्रीडाक्षेत्रातील पदाधिकारी आदी उपस्थीत होते.