‘मुलांच्या हातात पुस्तक हवे, कामाचे साधन नाही’बालकामगार निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन;शाळांनी २५ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांची नावे पाठवावीत-सहायक कामगार आयुक्त आशिष ढवळे यांचे आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 09/09/2026 7:10 PM

नांदेड  : बालकामगार निर्मूलनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सहायक कामगार आयुक्त कार्यालय, नांदेड यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, तर इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त आशिष ढवळे यांनी केले आहे.

बालपण हे प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील महत्त्वाचे आणि आनंददायी पर्व आहे. मुलांच्या हातात कामाचे ओझे नसून पुस्तक, शिक्षण, खेळ आणि स्वप्ने असली पाहिजेत. बालकामगाराची समस्या ही केवळ एका मुलाची किंवा कुटुंबाची समस्या नसून संपूर्ण समाजाच्या भवितव्याशी निगडित सामाजिक समस्या आहे. बालकामगार निर्मूलनासाठी शासनामार्फत विविध कायदे, योजना आणि जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. या प्रयत्नांना शाळा, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समाजातील प्रत्येक घटकाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.

*शाळास्तरावर विद्यार्थ्यांची निवड*

प्रत्येक शाळेने तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी इयत्ता ५ वी ते ७ वीमधील कमाल १० विद्यार्थ्यांची, तसेच निबंध स्पर्धेसाठी इयत्ता ८ वी ते १० वीमधील कमाल १० विद्यार्थ्यांची नावे २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत सहायक कामगार आयुक्त कार्यालयास कळवावीत.

विद्यार्थ्याचे पूर्ण नाव, इयत्ता, शाळेचे नाव, मुख्याध्यापक किंवा शिक्षकांचा मोबाईल क्रमांक, पालकांचा मोबाईल क्रमांक आणि उपलब्ध असल्यास विद्यार्थ्याचा मोबाईल क्रमांक ही माहितीही पाठविणे आवश्यक आहे. ही माहिती ८०८०४७२१९०, ९७६७६०१३१८, ८९७५९७६९४९ या क्रमांकांवर किंवा aclnanded@gmail.com या ई-मेलवर पाठवावी. सहभागी विद्यार्थ्यांना कार्यालयामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

*बालकामगार निर्मूलन विषयावर स्पर्धा*

चित्रकला स्पर्धेसाठी ‘बालकामगार मुक्त भारत’, ‘मला शाळेत जायचे आहे, कामावर नाही’, ‘बालपण वाचवा’, ‘बालकामगार मुक्त समाज’, ‘शिक्षणाचा अधिकार, बालमजुरीला नकार’, ‘माझे बालपण, माझे स्वप्न’ आदी विषयांवर चित्र साकारता येईल.

निबंध स्पर्धेसाठी ‘बालकामगार निर्मूलनाची गरज’, ‘बालकामगार : कारणे, परिणाम आणि उपाययोजना’, ‘बालकामगार मुक्त भारतासाठी विद्यार्थ्यांची भूमिका’, ‘बालहक्क आणि बालकामगार निर्मूलन’, ‘मुलांच्या हातात पुस्तक हवे, कामाचे साधन नाही’ आदी विषय देण्यात आले आहेत.

*तालुकास्तरावरून ९६ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड*

शाळांकडून प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येईल. स्पर्धेची तारीख व वेळ संबंधितांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. तालुक्यातील सोयीच्या शाळेत ही स्पर्धा घेण्यात येणार असून, तेथे विभागाचा अधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहील.

स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी शाळेचे ओळखपत्र किंवा ओळखपत्र उपलब्ध नसल्यास संबंधित विद्यार्थी त्या शाळेत शिकत असल्याचे मुख्याध्यापक अथवा शिक्षकांचे प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. चित्रकला व निबंधासाठी आवश्यक साहित्य विद्यार्थ्यांनी स्वतः आणावे.

तालुकास्तरीय स्पर्धेनंतर प्रत्येक तालुक्यातून चित्रकला व निबंध स्पर्धेतील प्रत्येकी ३ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय अंतिम स्पर्धेसाठी निवड केली जाईल. अशा प्रकारे चित्रकलेचे ४८ आणि निबंधाचे ४८, असे एकूण ९६ विद्यार्थ्यांची निवड होईल. या ९६ विद्यार्थ्यांना कार्यालयामार्फत आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

*जिल्हास्तरीय अंतिम स्पर्धेतील सहा विजेत्यांचा होणार गौरव*

जिल्हास्तरीय अंतिम स्पर्धेत चित्रकला व निबंध या दोन्ही प्रकारांतून प्रत्येकी तीन विजेत्यांची निवड करण्यात येईल. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या एकूण ६ विजेत्यांना आकर्षक बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

*गुणांकन पद्धत*

चित्रकला स्पर्धेसाठी विषयाची मांडणी ३०, कल्पकता २५, सामाजिक संदेश २०, चित्रातील सुसंगतता १५ आणि कलात्मकता व सादरीकरण १०, असे एकूण १०० गुणांचे मूल्यांकन करण्यात येईल.

निबंध स्पर्धेसाठी विषयाचे आकलन २५, आशय व मुद्देसूद मांडणी २५, बालकामगार विषयावरील ज्ञान २०, उपाययोजना व स्वतःचे विचार १५, भाषा व व्याकरण १० आणि सादरीकरण ५, असे एकूण १०० गुणांचे मूल्यांकन राहील.

शाळांचा सहभाग केवळ स्पर्धेपुरता मर्यादित न राहता बालकामगार निर्मूलनाच्या चळवळीतील सक्रिय सहभाग म्हणून पाहण्यात यावा. मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बालकामगाराच्या समस्येबाबत मार्गदर्शन करावे. तसेच परिसरात बालकामगार आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता संबंधित शासकीय यंत्रणेला माहिती देण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘मुलांच्या हातात पुस्तक हवे, कामाचे साधन नाही’ हा संदेश विद्यार्थ्यांच्या चित्रातून, लेखणीतून आणि विचारातून समाजापर्यंत पोहोचावा, हा या उपक्रमाचा व्यापक उद्देश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेकडे केवळ बक्षीस मिळविण्याची संधी म्हणून न पाहता बालकामगार निर्मूलनासाठी आपला आवाज व्यक्त करण्याची संधी म्हणून सहभागी व्हावे, असे सहायक कामगार आयुक्त आशिष ढवळे यांनी सांगितले.

Share

Other News

ताज्या बातम्या