सांगली जिल्हयातील होतकरू तरुणांना न्याय दे रे बाबा गणराया !!! , नागरिक जागृती मंचकडून गणरायांना साकडे...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 13/09/2026 11:25 AM

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८० शिपाई पदांच्या भरती प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न आणि संशय निर्माण झाले आहेत. या प्रक्रियेत कथित आर्थिक व्यवहार, वशिलेबाजी अथवा राजकीय हस्तक्षेप झाला असेल, तर त्यामुळे वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या प्रामाणिक आणि होतकरू उमेदवारांवर मोठा अन्याय होणार आहे.

शिपाई पदाची परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी तसेच लिपिक पदाच्या भरतीसाठी तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्तेवर आधारित आणि राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त असली पाहिजे.

सत्ताधारी पक्षातील काही मोजके लोकप्रतिनिधी वगळता बहुतांश लोकप्रतिनिधी या विषयावर मौन बाळगून आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि त्यांचे लोकप्रतिनिधीदेखील ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. राज्यातील इतर परीक्षांमधील गैरप्रकारांवर आवाज उठवणाऱ्या राजकीय नेत्यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भरतीबाबतही तितक्याच स्पष्टपणे भूमिका मांडली पाहिजे.

काही प्रसारमाध्यमांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली; मात्र काही माध्यमांनी या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले. संपूर्ण व्यवस्था मौन धारण करत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी लोकशाही व कायदेशीर मार्गाने संघटित होऊन सत्यासाठी आवाज उठवणे आवश्यक आहे.

आमच्या प्रमुख मागण्या:

- ८० शिपाई पदांची संपूर्ण भरती प्रक्रिया तातडीने स्थगित करावी.
- भरती प्रक्रियेची स्वतंत्र आणि निष्पक्ष यंत्रणेमार्फत चौकशी करावी.
- लेखी परीक्षा, उत्तरपत्रिका, गुणांकन आणि निवड निकषांची माहिती सार्वजनिक करावी.
- संचालक मंडळाकडे ठेवण्यात आलेल्या ३० गुणांचे औचित्य स्पष्ट करावे.
- गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी.
- संपूर्ण भरती प्रक्रिया आयबीपीएससारख्या विश्वासार्ह संस्थेमार्फत गुणवत्तेच्या आधारावर राबवावी.

सांगली जिल्ह्यातील तरुणांनो, हा प्रश्न केवळ ८० जागांचा नाही; हा आपल्या कष्टांचा, गुणवत्तेचा आणि भवितव्याचा प्रश्न आहे. अन्याय विसरू नका—पण त्याला उत्तर संविधानिक, शांततामय आणि लोकशाही मार्गाने द्या.

आता आमची गणरायाला एकच प्रार्थना—

जे कोणी होतकरू आणि प्रामाणिक तरुणांच्या भविष्याशी खेळत असतील, त्यांना सद्बुद्धी दे आणि या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दे!

हे गणराया… बघून घे रे बाबा!
होतकरू तरुणांना न्याय दे रे बाबा!

सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच, सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या