*मला जिल्हा बॅंकेचा संचालक झाल्यासारखं वाटतयं*

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 26/10/2021 12:23 PM


सातारा/प्रतिनिधी

सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणुक रणधुमाळी सुरू झाली अन् बघता बघता उमेदवारीअर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिसव पण संपला. बॅंक जिल्ह्याची असली तरी आपण खटाव तालुक्यावर भाष्य करणार आहोत. खटाव तालुक्यातून आजवर सोसायटी मतदार संघातून अनेक मान्यवरांनी प्रतिनिधित्व केले. या बॅंकेला डायरेक्टर म्हणून जाण्याची अनेकांची इच्छादेखील होती. परंतू , तालुक्यातील अनेक मान्यवरांना या बॅंकेत जाता आले तर अनेकांची इच्छा अपूर्ण राहीली हा इतिहास आहे. पण तो काळ पक्षनिष्ठेला मान देणारा होता, नेतृत्वाचं ऐकण्याचा अन् प्रामाणिक नेत्यांचा होता. जसं जसं आपण आज टेक्नोसॅवी होत गेलो तसं तसं इतर क्षेत्रांप्रमाणे राजकारणातही बाजारूपणा वाढीस लागला. अन् मग निष्ठा कधी फाट्यावर तर कधी छाताडावर दिसू लागली. आज तालुक्यातून साधारणपणे चार उमेदवारीअर्ज दाखल झाल्याचे ऐकिवात आहे (एखाद दुसरा बदल असू शकतो). अन् मग तालुक्यातला नागरिक म्हणून सगळ्या चेहर्‍यांवर नजर मारून यातले लढणार कोण?टिकणार कोण?प्रबळ दावेदार कोण? हे प्रश्न मनातल्या मनात स्वत:लाच विचारत असताना एक मोठी शंका मनात आली. ती म्हणजे यातलं देण्याघेण्यासाठी पळतयं कोण? ज्यांनी  अर्ज भरलेत ते खरच लढतील ना, नाहीतर काहीजण सवयीप्रमाणे चारी बाजूंनी खिसा गरम करून पक्षआदेशाचे लेबल लावून या रणांगणातून पळ तर काढणार नाहीत ना? आणि म्हणून तालुक्यातल्या जनतेला जागृत करण्यासाठी कामधंदा नसल्यागत लिहायला बसलो. जर या निवडणुकीत कोणी माघार घेतली तर त्यांच्यावर भरोसा ठेवणार्‍या लोकांचा स्वाभिमान जपणार कोण? अनुमोदक,सुचक तर होळीच्या टेकावरूनच बोंबलणार यात शंका नाही. त्यामुळे जिल्हा बॅंकेचं नाही तर त्यापुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत जनतेने अशा पळ काढणार्‍या प्रवृत्तींवर लक्ष ठेवायला हवं. कारण तुम्ही चार ठराव दिले,अनुमोदन दिले म्हणून त्यांना उमेदवारीअर्ज भरता आलेला आहे. मात्र, माघार घेताना तुमच्या याच ठरावांच्या जोरावर कोण स्वत:च्या तुंबड्या भरणार असेल तर तुम्ही घेतलेला वाईटपणा कोणासाठी होता. त्यामुळे आपल्या ठरावाच्या जोरावर, आपण दिलेल्या मतांच्या जोरावर कोणी स्वत:चे महत्व वाढवत पैसे उखळणार असेल तर आपण वेळीच सावध व्हायला पाहिजे. नाहीतर आज आपल्या मतांच्या जोरावर पैकं घेतलं जात्यात भविष्यात आपल्या जमिनीवर बोजा चढवायला हे महाभाग कमी करणार नाहीत. त्यामुळे बारिक ध्यान ठेवा म्हंजी लक्षाय येईल कुणी लढायला उमेदवारीअर्ज भरलाय अन् कुणी तोडपाणीसाठी भरलाय. तालुज्यातला नागरिक म्हणून तुल्यबळ उमेदवारांना विनंती आहे की, कोणालाच माघारीसाठी हिंग लावू नका, होऊन जाऊ द्या लढाई. मग सगळ्यांना कळेल कुणाच्यात किती दम आहे.

बाकी सविस्तर उमेदवारीअर्ज माघारी घेण्याच्या तारखेनंतर रोज भेटू 
*मला जिल्हा बॅंकेचा संचालक झाल्यासारख वाटतयं

Share

Other News

ताज्या बातम्या