नांदेड - राष्ट्रीय महामार्गावर नांदेड शहर ते अर्धापूर दरम्यान अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता या भागात 'इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम' आणि सीसीटीव्ही पाळत ठेवणारी यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली आहे.
सदर महामार्गावरील सतत होणारे अपघात व जीवित हानी लक्षात घेता ही अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याची आवश्यकता खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली असून, याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी विस्तृत चर्चा केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येणारा अर्धापूर जवळील पार्डी मक्ता टोल प्लाझा ते नांदेड शहरातील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रवेशद्वारपर्यंत सुमारे ३३ किलोमीटरचा रस्ता सध्या अत्यंत अपघातप्रवण झाला आहे. या मार्गावरील वाहनांची वाढती संख्या आणि अलीकडच्या काळात झालेले अनेक गंभीर अपघात पाहता वाहतूक नियंत्रणासाठी व आपात्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज असल्याचे खा. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
'इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम' आणि सीसीटीव्ही यंत्रणा उभारल्यानंतर वाहतुकीवर २४ तास सतत नियंत्रण व देखरेख, अतिवेगाने धावणारी वाहने व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई, तसेच अपघात व वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी तातडीने मदत पोहोचवणे शक्य होईल, असे ते पुढे म्हणाले. खा. अशोकराव चव्हाण यांनी मांडलेल्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत लवकरच योग्य निर्णय घेण्यास अनुकूलता दर्शवली आहे.