नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र आणि रसायनशास्त्र संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून प्रसिद्ध व्याख्यात्या डॉ. उज्वला सदावर्ते उपस्थित होत्या.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. उज्वला सदावर्ते यांनी महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या महत्त्वावर विशेष भर दिला. त्या म्हणाल्या की, स्त्रीचे शारीरिक आरोग्य हा तिच्या आत्मविश्वासाचा पाया असतो. पौगंडावस्था ते रजोनिवृत्तीपर्यंत शरीरात होणारे बदल समजून घेत महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. व्यायाम आणि संतुलित आहार हा पर्याय नसून जीवनाचा आवश्यक भाग आहे, असे त्यांनी सांगितले.
महिलांच्या बहुआयामी भूमिकांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, स्त्रीने सर्व नातेसंबंधांच्या पलीकडे जाऊन स्वतःला स्वतंत्र व्यक्ती म्हणून ओळखले पाहिजे. स्वतःचे छंद जोपासावेत आणि कोणतेही काम ओझे न समजता आनंदी वृत्तीने करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी स्वरचित कविता, गीते आणि भारुड सादर करून उपस्थितांचे प्रबोधन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रसायनशास्त्र संकुलाच्या संचालिका डॉ. संगीता माकोने यांनी महिला सक्षमीकरणाबाबत आपले विचार मांडले. महिलांनी एकमेकींशी स्पर्धा करण्याऐवजी स्वतःशीच स्पर्धा करावी. परस्पर सहकार्य आणि एकजूट हीच महिलांची खरी ताकद असून ती समाजाला सकारात्मक दिशा देणारी ठरते, असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन विशेष उपक्रम राबवण्यात आले. काव्य दर्शन या उपक्रमांतर्गत डॉ. ज्ञानेश्वर वानखेडे यांच्या कवितांच्या भित्तीपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच रसायनशास्त्र संकुलातील प्रथम वर्षातील गुणवंत विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. सुनिता पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला रसायनशास्त्र संकुलातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.