*विविध घटकांशी संवाद*
गडचिरोली दि. २: जिल्ह्यात रस्ते, रेल्वे या विकासात्मक कामांसोबतच पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्यपाल श्री सी.पी. राधाकृष्णन यांनी आज केले.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज गडचिरोली जिल्हा दौऱ्यात शासकीय विश्रामगृह येथे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व पत्रकारांशी जिल्ह्यातील विविध विकास विषयक प्रश्नांवर चर्चा केली. तसेच उद्योग, संस्कृती, पर्यटन आणि प्रमुख उत्पादनाबाबत विविध समाज घटकांशी संवाद साधून त्यांच्या विकास विषयक अपेक्षा, समस्या व संकल्पना जाणून घेतल्या.
प्रभारी जिल्हाधिकारी आयुषी सिंह यांनी जिल्ह्याची ऐतिहासीक व सांस्कृतीक माहिती, उद्योग व शासकीय विकास योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची व पुढील नियोजनाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. जिल्हा पोलीस अधिक्षक श्री निलोत्पल यांचेसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सुरवातील जिल्ह्यातील विकास कामांची व समस्यांची माहिती जाणून घेतली. जिल्ह्यात सुरू असलेली आणि नियोजित विकास कामे, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे बळकटीकरण, वैद्यकीय महाविदयालय, आरोग्य व शैक्षणीक क्षेत्रातील समस्या, दुर्गम भागामध्ये मुलभूत पायाभूत सुविधा, उद्योगांच्या समस्या, वनउपज, तेंदूपत्ता साठवणूक, नक्षलवाद यासारखे विषय विविध शिष्टमंडळांकडून मांडण्यात आले. राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सर्व गटांचे म्हणणे ऐकून घेत सर्व मागण्या व विकास संकल्पनांबाबत लक्ष घालण्याबाबत आश्वस्त केले.
गडचिरोली जिल्हा नैसर्गीक वने व खनिज साधनसंपदेने नटलेला आहे. यावर आधारित उद्योग, रोजगारात वाढ करून आदिवासी बहुल क्षेत्राच्या सर्वांगिन विकासाला प्रोत्साहन देण्याची अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. जिल्ह्यात स्त्री-पुरूष साक्षरतेत मोठी दरी असून महिलांना अधिक शिक्षीत करण्यासाठी प्रयत्न करने, दुर्गम भागातील नागरिकांना जीविकेसाठी वनपट्टे, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिम राबविने, आदिवासींचे हक्क हिरावून घेणाऱ्यांवर कडक कारवाई करणे, आदि सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मनरेगा कामात जिल्ह्यात झालेल्या चांगल्या कामाचे त्यांनी कौतुक केले.
आरोग्य सेवेचा आढावा घेतांना जिल्हा रूग्णालयात कोणकोणत्या शस्त्रक्रियांची सुविधा आहे याबाबत विचारणा करून जेथे पेशन्ट रेफर करण्यात येते त्या नागपूर येथील वैद्यकीय रूग्णालयात गडचिरोली जिल्ह्यातील रूग्णांसाठी एक समन्वयक नेमावा जेणेकरून संबंधीत रूग्णांना मदत होईल. गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा आहे येथे एकलव्य आदिवासी शाळांची संख्या वाढवण्यासाठी मागणी करावी तसेच मलेरिया निर्मूलनासाठी विशेष मोहिम राबविण्याचे व त्यासाठी विशेष निधी मंजूर करण्यासाठी आपण पाठपुरावा करू असेही ते म्हणाले. पुढील दौऱ्यात आदिम जनजातीच्या गावात भेट देण्यात येईल व कोणत्याही कारणास्तव ही भेट रद्द होणार नाही अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.
0000