आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
*- पालकमंत्री शंभूराज देसाई*
सातारा दि : पाटण तालुक्यातील काठी टेक व अरवली या गावांसह 11 गावांवर उद्योग व कामगार विभागाचे बॉक्साइटसाठी आरक्षीत शिक्के आहेत. हे शिक्के काढण्यासाठी या 11 गावांचे पुन्हा सर्व्हेक्षण करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
शासकीय विश्रामगृहात आरक्षीत शिक्के उठविण्याबाबत व तारळी प्रकल्पातील कुशी प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्यासह सबंधित विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
बॉक्साइटसाठी आरक्षीत असल्याने तेथील शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आरक्षणाचे शिक्के काढण्यासाठीचा सकारात्मक प्रस्ताव सादर करावा, असेही निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.
तारळी प्रकल्पातील कुशी प्रकल्पग्रस्तांनी वाढीव रक्कम मिळावे यासाठी मागणी केली आहे. वाढीव रक्कमेचा प्रस्तावही महसूल विभागाने पाठवावा. महसूल व जलसंपदा मंत्री यांच्याशी चर्चा करुन निधीचा प्रश्नही मार्गी लावला जाईल, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले.