*प्रमुख निमंत्रकांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन*
*सांगली जिल्ह्यातील जनसामान्यची असुरक्षिततेची भावना मुख्यमंत्रीसमोर मांडणार*
*दहा हजार शस्त्र परवाना अर्ज मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष देणार*
वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने नावारूपास असलेला सांगली जिल्हा आहे. प्रत्येकाला अभिमान वाटावा, गौरव वाटावा असा सांगली जिल्हा सध्या नशाखोरीमुळे लयास चाललेला स्पष्टपणे दिसतो. सांगली जिल्ह्याची प्रतिमा मलीन होत असल्याचे दिसते आहे आणि म्हणून सामाजिक स्वास्थ, सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून भयमुक्त व नशामुक्त अभियान' सुरू करण्यात आले आहे.
सुरुवातीला अभियानाच्या माध्यमातून सर्व सामाजिक संस्था आणि राजकीय पक्ष यांनी एकत्रितरित्या सांगलीच्या ऐतिहासिक स्टेशन चौक येथून प्रशासनास जागे करण्यासाठी लक्षवेधी धरणे आंदोलन केले होते. प्रशासनाबद्दल सामान्य जनतेमध्ये असलेला रोष, त्याची जाणीव प्रशासनास व्हावी आणि नागरिकांनी आपलेही कर्तव्य समजून या आवश्यक असणाऱ्या अभियानामध्ये सामील व्हावं. म्हणून जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.
गेल्या दहा दिवसाच्या कालावधीत साधारण दहा हजार पेक्षा अधिक सांगलीतील सुज्ञ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रतिकात्मक स्वरूपात शस्त्र परवाना मागणी अर्ज केले आहेत. महाराष्ट्रचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन स्वरूपात प्रत्यक्ष भेटून देणार असल्याचे भयमुक्त नशामुक्त अभियानचे प्रमुख निमंत्रक यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत सांगितले आहे. दरम्यान, प्रशासनाने मुख्यमंत्री यांची भेट नाकारल्यास गनिमी काव्याने मुख्यमंत्री महोदय यांची भेट घेऊन जनभावना कळविणार असल्याचे निमंत्रक यांनी सांगितले आहे.
यावेळी, मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष शंभूराज काटकर, पत्रकार कुलदीप देवकुळे, सृष्टी फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र वळवडे, बीएसएनएलचे समिती सदस्य युसुफ ऊर्फ लालू मिस्त्री, व्यंगचित्रंकार रोहित कबाडे, मराठा सेवा संघचे नितीन चव्हाण, नागरिक जागृती मंचचे आर्किटेक रवींद्र चव्हाण, तानाजी रुईकर, मनसे शहराध्यक्ष सुरेश टेंगले, मनसे विभाग अध्यक्ष प्रशांत जमगई,अमित पाटील इत्यादी उपस्थित होते.
*ठळक*
* भयमुक्त, नशामुक्त अभियान'च्या प्रमुख निमंत्रकांशी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्वतः पुढाकार घेत साधला संवाद
* सांगली जिल्हा पोलिसांची समन्वय-सुसंवादाची भूमिका
* सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी, नागरिकांमध्ये असणारे भय, असुरक्षिततेची भावना, त्यावरील खबरदारीचा उपाय, पोलीस आणि सामान्य माणूस यांच्यातील परस्पर विश्वास, यासंबधी निमंत्रक यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.