नांदेड : आजच्या काळात वाढता वैद्यकीय खर्च हा अनेक कुटुंबांसाठी चिंतेचा विषय बनला असून विश्वासार्ह रुग्णालयांमध्ये, परवडणाऱ्या दरात, योग्य उपचार मिळावेत, ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. ह्याच जाणिवेतून सौ. मिनल गजानन पाटील यांच्या वतीने सांगवी प्रभागातील प्रत्येक घरामध्ये आरोग्याची हमी” या उद्देशाने ‘मोफत आरोग्य सवलत कार्ड‘ उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापासून मोफत कार्ड वाटप करण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी थेट मदत करणारा असा सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या मिनल पाटील पहिल्या कार्यकर्त्या ठरल्या आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या महान कार्याला स्मरून कौटिल्य भारत फाउंडेशन, प्रतिज्योत वैद्यकीय मदत व मार्गदर्शन संस्था यांच्या सहकार्याने हे अभियान राबविले जाणार असून प्रत्येकाला घरपोच हे कार्ड दिले जाणार आहेत. या कार्डद्वारे नांदेडमधील नामांकित ७५ पेक्षा अधिक रुग्णालयांमध्ये ५० टक्के पेक्षा अधिकच्या सवलतीत तपासण्या व वैद्यकीय उपचार उपलब्ध होणार आहेत.
या कार्डच्या माध्यमातून बाह्यरुग्ण, रक्त तपासणी, सिटी स्कॅन, एक्स रे, एम आर आय, सोनोग्राफी, कॅन्सरच्या तपासणी व उपचारात महत्त्वाच्या असलेल्या ॲंन्जीओग्राफी व ॲंन्जीओप्लास्टी यांसह अनेक तपासणी व उपचारांचा यात समावेश करण्यात आला आहे
तसेच, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना महाराष्ट्रातील सर्व मोठ्या धर्मदाय रुग्णालयात अत्यंत माफक दरात शस्त्रक्रिया व इतर उपचार सुध्दा उपलब्ध होणार आहेत.
"हा लाभ माझ्या सांगवी प्रभागातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावा आणि कुठल्याही कुटुंबाला उपचारांच्या खर्चामुळे अडचण येऊ नये, हेच माझे ध्येय असून ‘निरोगी प्रभाग म्हणजे प्रगत प्रभाग‘,
हे तत्त्व मनात ठेवून मी नेहमीच माझ्या सांगवी प्रभागातील जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहील, असा विश्वासही सौ. मिनल गजानन पाटील यांनी यावेळी दिला."