नांदेड :- राज्य वस्तू व सेवाकर विभागाच्या छत्रपती संभाजीनगर क्षेत्रातील आठही जिल्ह्यात GSTR - 3B कर विवरणपत्र भरण्यासाठी दिनांक 10 ते 20 डिसेंबर 2025 या कालावधीत विशेष मोहीम घेण्यात येत आहे.
वस्तू व सेवाकर कायद्यानुसार नोंदणीकृत करदात्यांनी दर महिन्याच्या 20 तारखेपर्यंत मासिक GSTR- 3B कर विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. मात्र काही कारणांनी ही विवरणपत्र दाखल करावयाची बाकी असल्यास संबंधित करदात्यांनी नोव्हेंबर 2025 पर्यंतची सर्व प्रलंबित विवरणपत्र दिनांक 20 डिसेंबर पर्यंत भरावी असे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
*काय आहे 3B विवरणपत्र*
GSTR3B हे स्वयं-घोषित (self-declared) मासिक/तिमाही सारांश विवरणपत्र आहे.
यात करदात्याने कर दायित्व, RCM दायित्व आणि उपलब्ध आवक कर वजावट (Input Tax Credit) यांची नोंद करावी लागते. या विवरणपत्राद्वारेच वास्तविक GST भरणा केला जातो.
GSTR-3B न भरल्यास GSTN प्रणाली मध्ये स्वयंचलित पद्धतीने दंड व व्याज लागू होते. GSTR3B विवरणपत्र न भरल्यास रु. 50000 /-रुपयांपर्यंत शास्ती आकारली जाऊ शकते.
दोन किंवा अधिक विवरणपत्र प्रलंबित असल्यास विशिष्ट प्रकरणांमध्ये बँक खाते गोठवण्याची तरतूद कायद्यात आहे. तसेच सहा विवरणपत्र प्रलंबित असतील तर नोंदणी रद्द करण्याचे प्रावधान आहे.
त्यामुळे GSTR 3B विवरणपत्र नियमितपणे दाखल करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
विशेष मोहिमेत प्रलंबित विवरणपत्र दाखल करा: अपर आयुक्त, वस्तू व सेवाकर विभाग*
छत्रपती संभाजीनगर क्षेत्रातील ज्या GST करदात्यांचे 3B विवरणपत्र दाखल करण्याचे प्रलंबित असतील त्यांनी सदर विवरणपत्र मोहीम कालावधीत दाखल करावेत व पुढील कारवाई टाळावी, असे आवाहन *छत्रपती संभाजीनगर क्षेत्राचे अपर आयुक्त (राज्य वस्तू व सेवाकर विभाग) अभिजीत राऊत (भा प्र से) यांनी केले आहे.