नांदेड :- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय नियमित लसीकरण समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील लसीकरणाच्या विविध निर्देशकांचा (Indicators) सविस्तर आढावा घेण्यात आला आला.या बैठकीत uwin आणि आगामी काळात सुरू होणाऱ्या एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेवर विशेष चर्चा करण्यात आली.
ग्रामीण व शहारी भागातील लसीकरणावर भर
बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात साधारणतः २ हजार लसीकरण सत्रे व शहरी भागात 250 लसीकरण सत्रे आयोजित केली जातात. या सत्रांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक बालकापर्यंत आणि गरोदर मातांपर्यंत लसीकरणाचा लाभ पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कर्डीले यांनी दिले. लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन (Micro-planning) करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
'एचपीव्ही' लसीकरण: ३३ हजार लाभार्थ्यांचे उद्दिष्ट
या बैठकीचे मुख्य आकर्षण म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणाऱ्या एचपीव्ही (HPV) लसीची चर्चा झाली आणि मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध होणार हा फार मोठा फायदा होणार आहे . सर्व पात्र लाभार्थ्यांनी या लसीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे
* लाभार्थी संख्या: जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येनुसार साधारणतः ३३,००० लाभार्थी या लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत.
* वयोगट: ही लस १४ वर्षे पूर्ण ते १५ वर्षे वयोगटातील मुलींना देण्यात येणार आहे (अर्थात मुलीच्या १४ व्या वाढदिवसानंतर ते १५ व्या वाढदिवसापर्यंत).
विविध निर्देशकांचा आढावा
जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरण इंडिकेटरवाईज प्रगतीचा आढावा घेतला. यामध्ये प्रलंबित राहिलेली बालके (Left-outs) आणि अर्धवट लसीकरण झालेली बालके (Drop-outs) शोधून त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. माता व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी नियमित लसीकरण ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुटे, शिक्षण अधिकारी माधव सलगर, एस एम ओ लातूर डॉ. अमोल गायकवाड, बाळ रोग तज्ञ विभागप्रमुख,.किशोर राठोड, आयएपी नांदेड डॉ सुहास बेंद्रीकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका दराडे जिल्हा सहनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी अनिल कांबळे, शहरी कार्यक्रमाधिकारी सोनुले सुहास,रोहित जोशी तसेच संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.